गौण खनिजातून १७ वर्षांत आष्टीने कमविले ३४ कोटी
By Admin | Updated: May 8, 2017 00:33 IST2017-05-08T00:33:52+5:302017-05-08T00:33:52+5:30
गौण खनिजाच्या माध्यमातून २००१ ते २०१७ या काळात तालुक्यातून शासनाला ३४ कोटी रुपयांचा गौणखनिज महसूल प्राप्त झाला आहे.

गौण खनिजातून १७ वर्षांत आष्टीने कमविले ३४ कोटी
तरीही रस्ते विकासाकरिता निधी देण्यास नकार
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : गौण खनिजाच्या माध्यमातून २००१ ते २०१७ या काळात तालुक्यातून शासनाला ३४ कोटी रुपयांचा गौणखनिज महसूल प्राप्त झाला आहे. यातून तालुक्याच्या विकासकामांवर केवळ ५० लक्ष रुपये मिळाल्याची माहिती आहे. तालुक्यातून एवढा महसूल गौणखनिजाच्या माध्यमातून मिळत असताना तालुक्याच्या विकासाकरिता शासनाकडून पाठ दाखविण्यात येत असल्याने तालुका वासीयांकडून संताप व्यक्त होत आहे.
रेतीघाट लिलाव झाल्यानंतर प्रचंड क्षमतेच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे ग्रामीण या भागातील रस्त्यांची वाट लागली आहे. चिंचोली अॅप्रोच रोड २ किमी, गोदावरी रस्ता २.५०० किमी, भिष्णुर रस्ता ५ कि़मी., टेकोडा येथील १.५०० कि़मी. चा हा रस्ता वाहन चालविण्यायोग्य नसल्याचे दिसून आले आहे. काळ्या मातीचा भाग असल्याने जडवाहने जाताच रस्त्यांवर खड्डे पडतात. कुण्या ग्रामस्थाची प्रकृती बिघडल्यास त्याला खाटेवर टाकून रस्त्यावर्यंत आणावे लागत असल्याचे वास्तव आहे. खासदार व आमदारांनी येथे एकदा भेट देत पावसाळ्यात गावातील २.५०० कि़मी. चा हा रस्ता पायी चालून दाखवावे असे आव्हान उपसरपंच राजू कुरवाडे यांनी केले आहे.
शासनाला १७ वर्षांत ३४ कोटीचा महसूल मिळाला. त्यात एकट्या गोदावरी गावाचा नऊ कोटीचा महसूल आहे. असे असताना या गावाला अद्याप निधी न मिळणे ही शोकांतिका शोकांतीकाच म्हणवी लागेल. सुरू सत्रात या गावाला निधी देण्याची मागणी आहे.