आर्वी नाका चौक नावापुरताच मोठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2015 02:21 IST2015-07-12T02:21:34+5:302015-07-12T02:21:34+5:30
शहरात ऐतिहासिक महत्त्व आणि अनेक बिकट प्रसंग अनुभवलेला चौक म्हणून पाच रस्त्यांच्या आर्वी नाका चौकाची ओळख आहे.

आर्वी नाका चौक नावापुरताच मोठा
वर्धा : शहरात ऐतिहासिक महत्त्व आणि अनेक बिकट प्रसंग अनुभवलेला चौक म्हणून पाच रस्त्यांच्या आर्वी नाका चौकाची ओळख आहे. १९७३ पासून १९९२-९३ पर्यंत जकात कर नाका, पोलीस चौकी, प्रवासी निवारा व आता आर्वी नाका चौक अशी स्थित्यंतरे पार केलेल्या आर्वी नाक्याने जुनी ओळख हरवली आहे. सध्या हा विस्तीर्ण चौक अतिक्रमण, अव्यवस्था, नियोजनाचा अभाव आणि रहदारीच्या गर्दीत गुदमरत असल्याचे दिसते. या चौकाचे सौंदर्यीकरण कधी होणार, हा प्रश्नच आहे.
शहरातील महत्त्वाचा चौक म्हणून आर्वी नाक्याकडे पाहिले जाते. पूर्वी जकात कर वसूल केला जात असे. यासाठी म्हणून या चौकात नाका वसुलीसाठी छोटेखानी खोलीचे बांधकाम करण्यात आले होते. यातून जकात कर वसूल होत होता. १९९२-९३ मध्ये जकात कर वसुली बंद करण्यात आली. यामुळे ही खोली तशीच होती. १९९३-९४ मध्ये या चौकात पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली. जकात कर नाक्याच्या खोलीतूनच पोलीस चौकीचा कारभार चालविला जात होता. आर्वी नाका परिसरात पूर्वी शिख समाजाचे वास्तव्य होते. या चौकात चोरी, लुटमार, भांडणे नेहमीचीच झाली होती. यामुळे त्या काळी आर्वी नाका म्हटला की, कुणीही तिकडे जाण्यास धजावत नव्हते. शिवाय शहराची हद्दही संपत असल्याने तेथे पोलीस चौकी स्थापन करण्यात आली होती; पण पोलिसांचे तेथील वादांकडे लक्ष राहत नव्हते. यामुळे एक-दीड वर्षांतच चौकीही हटली. यानंतर २००१ ते २००३ या दरम्यानच्या काळात चौकात प्रवासी निवारा स्थापन करण्यात आला. सुमारे तीन-चार वर्षांच्या काळात म्हणजे २००५-०६ मध्ये तोही हटविण्यात आला. यानंतरही जकात कर नाल्याची खोली तशीच ठेवण्यात आली होती.
२००३ नंतर या चौकाचे सौंदर्यीकरण व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळ्याचा ठराव पालिकेकडून घेण्यात आला. आर्वी नाका चौकाचे नामकरण करण्याचेही ठरविण्यात आले; पण माशी कुठे शिंकली, हे कळण्यास मार्ग नाही. आजही आर्वी नाका चौकाचे भकास व मागासलेपण सामान्यांना खटकल्याशिवाय राहत नाही. नियोजनाचा अभाव असल्याने सध्या या चौकात अव्यवस्था असून शहराचा आत्माच हरवल्याचे चित्र आहे.