भूखंड वाटप घोटाळ्याची फेरचौकशी व्हावी
By Admin | Updated: June 13, 2015 02:16 IST2015-06-13T02:16:45+5:302015-06-13T02:16:45+5:30
गावठाण विस्तार योजनेंतर्गत १९९१-९२ मध्ये नजीकच्या दहेगाव धांदे येथील भूखंड वाटप, खरेदी-विक्री व अतिक्रमण झाले होते.

भूखंड वाटप घोटाळ्याची फेरचौकशी व्हावी
पुलगाव : गावठाण विस्तार योजनेंतर्गत १९९१-९२ मध्ये नजीकच्या दहेगाव धांदे येथील भूखंड वाटप, खरेदी-विक्री व अतिक्रमण झाले होते. या प्रकरणी पंचायत समिती व महसूल विभागाची भूमिका संदिग्ध होती. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी एकनाथ धवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
१९९१-९२ मध्ये गावालगत २१ भूखंड पाडून गरजू लाभार्थ्यांना देण्यात आले; पण अनेक गरजू, बेघर लोक भूखंडापासून वंचित राहिले होते. याबाबत वरिष्ठांनी तलाठ्यांना अहवाल सादर करण्यास सांगितले. अहवालानुसार मौजा दहेगाव धांदे येथील सर्व्हे क्र. १२१/१ आराजी १ हेक्टरपैकी ०.४० आरमध्ये २१ प्लॉट पाडून वाटप करण्यात आले; पण त्यातील सहा भूखंडावर अद्यापही बांधकाम झालेले नाही. नारायण श्यामराव आंबेकर यांच्या प्लॉट क्र. १० वर दिलीप नत्थू शिंदे, बेबी मारोतराव वानखेडे, प्लॉट क्र. १२ वर राजेश दौलत रंगारी, प्लॉट नं. १३ वर सुभाष महादेव विरूळकर हे अतिक्रमण करून राहत आहेत. येथे पुनर्विक्री व अतिक्रमण होऊन शर्तभंग झाला; पण अद्याप कुणारवरही कारवाई झाली नाही, हे विशेष! तलाठ्यांनी वरिष्ठांना दिलेली माहती पूर्णसत्य नसून अनेक भूखंडाची विक्री झाली आहे. आठ प्लॉटची नियमबाह्य नोंदणी केली आहे. या सर्व प्रकरणाची फेरचौकशी व्हावी, ग्रामसेवकांनी असिसमेंट कॉपी जाहीर करावी, अशी मागणीही धवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.(प्रतिनिधी)