चंद्रमौळी झोपडीत ‘समर्पणा’तून उजळला ज्ञानाचा दिवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:00 IST2020-07-31T05:00:00+5:302020-07-31T05:00:07+5:30
समर्पण झोपडीवजा घरात राहतो. टिनाचे छप्पर, भिंत म्हणून लावलेले पॉलिथिन, अतिशय तोकडी जागा असलेले घर, अभ्यास करायची स्वतंत्र व्यवस्था नाही, स्टडीरूम, हॉल, किचन, बेडरूम सर्वकाही एकत्रच. अशाही परिस्थितीमध्ये समर्पणने सतत अभ्यासाचा ध्यास घेत दहावीच्या परीक्षेमध्ये गणितामध्ये १०० पैकी १०० तर विज्ञान विषयांमध्ये शंभरपैकी ९९ गुण मिळवले. ९४.४ टक्के गुण घेऊन त्याने गांधी विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवला.

चंद्रमौळी झोपडीत ‘समर्पणा’तून उजळला ज्ञानाचा दिवा
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : नगर परिषद संचालित गांधी विद्यालयातील इयत्ता दहावीचा विद्यार्थी जनतानगरातील रहिवासी समर्पण शारदा राजू वैद्य याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विद्यालयाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.
समर्पण झोपडीवजा घरात राहतो. टिनाचे छप्पर, भिंत म्हणून लावलेले पॉलिथिन, अतिशय तोकडी जागा असलेले घर, अभ्यास करायची स्वतंत्र व्यवस्था नाही, स्टडीरूम, हॉल, किचन, बेडरूम सर्वकाही एकत्रच. अशाही परिस्थितीमध्ये समर्पणने सतत अभ्यासाचा ध्यास घेत दहावीच्या परीक्षेमध्ये गणितामध्ये १०० पैकी १०० तर विज्ञान विषयांमध्ये शंभरपैकी ९९ गुण मिळवले. ९४.४ टक्के गुण घेऊन त्याने गांधी विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची.
वडिलांचा कुठलाही आधार नाही. आई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने तो शिकत राहिला. अभ्यास करीत राहिला. शाळेतील मित्र, शिक्षक मदत करायचे. भविष्यामध्ये सीएच व्हायचं ही खूणगाठ त्याने मनाशी बांधली आणि ती पूर्णत्वास जाण्याच्या दिशेने त्याने पहिले पाऊल टाकले आहे.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी विद्याधर अंधारे, नगराध्यक्ष प्रशांत भाऊ सव्वालाखे, शिक्षक संजय किटे, स्मिता बिजवे, नावेद गणी, एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे, प्राचार्य उषा नागपुरे यांनी त्याचे कौतुक केले. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी शिक्षकांनी त्याला रोख स्वरूपात बक्षीस दिले.
विद्याविनयेन शोभते
परिस्थिती यशाच्या मार्गात येऊ शकत नाही, याचे अत्यंत सुंदर उदाहरण म्हणजे समर्पण. समर्पण हा जेवढा हुशार आहे तेवढाच तो नम्र स्वभावाचा आहे. म्हणूनच विद्याविनयेन शोभते, ज्ञानाबरोबरच आपल्यामध्ये असायला पाहिजे, हे त्याने दाखवून दिले आहे. इतरांनी सुद्धा त्याला भेट द्यायला पाहिजे.