नगराध्यक्षपदासाठी लाखोंची उलाढाल होणार
By Admin | Updated: July 20, 2014 00:04 IST2014-07-20T00:04:19+5:302014-07-20T00:04:19+5:30
जिल्ह्यातील सहापैकी देवळी पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी शोभा तडस यांची एकमेव दावेदारी असल्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. घोषणेची औपचारिकता तेवढी शिल्लक आहे.

नगराध्यक्षपदासाठी लाखोंची उलाढाल होणार
२२ ला निवडणूक : अनेकांनी बांधले बाशिंग
वर्धा : जिल्ह्यातील सहापैकी देवळी पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी शोभा तडस यांची एकमेव दावेदारी असल्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. घोषणेची औपचारिकता तेवढी शिल्लक आहे. उर्वरित पाच पालिकांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकेका नगरसेवकांसाठी चांगलीच रस्सीखेच सुरू असून मोठ्या प्रमाणावर घोडा बाजार होण्याची दाट शक्यता आहे.
या शर्यतीत जो अधिक भाव देईल, त्याच्याच दावणीला ते ते नगरसेवक बांधले जाईल, अशीही राजकीय गोटातील माहिती आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लाखो रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता नाकारता येत आहे. वर्धा, हिंगणघाट, पुलगाव, आर्वी, देवळी, सिंदी (रेल्वे) या पालिकांच्या नगराध्यक्षाचा अडीच वर्षांचा कालावधी संपुष्टात आला. नव्या नगराध्यक्ष निवडीकरिता येत्या मंगळवार दि. २२ जुलै रोजी निवडणुका होऊ घातल्या आहे. या निवडणुकीला आता अवघे चार दिवस उरले आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक म्हणजे, नगरसेवकांसाठी पर्वणीच, असा अर्थ काढून काही नगरसेवक आपली वेगळी चूल मांडून आपले वेगळे अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे वेगळे...हे नगराध्यक्षाच्या शर्यतीत असेलल्या उमेदवारांपासून लपून राहिले नाही. त्यांचे मन वळवून मतदानासाठी प्रवृत्त करण्याची कसरत उमेदवारांसह संबंधित राजकीय पक्षांनाही करावी लागत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात घोडाबाजार सुरू असल्याची माहिती आहे. काही पालिका क्षेत्रातील नगरसेवक सहलीचा आनंद लुटत असल्याची माहिती आहे. काहींनी दुसऱ्या उमेदवारांनी पळवू नये म्हणून भूमिगत केल्याचीही माहिती आहे. ही मंडळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दिवशी एकाएकी अवतरतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकदा नगराध्यक्षपद मिळाले, तर त्या सोबत मानसन्मान आणि प्रतिष्ठा आपोआप चालून येईल, या अनुषंगाने उमेदवारांनीही जोरदार फिल्डींग लावली आहे. बजेट वाढला तरी गड जिंकायचा अशा बेतात, काही उमेदवार आहे. या निवडणुकीत कोण सिनिअर आणि कोण ज्युनिअर हा भेद न पाळता जो आर्थिकदृष्ट्या मजबूत तोच बाजी मारणार, असा फंडा राजकीय पक्षांकडून वापरला जात असल्याची माहिती आहे.(जिल्हा प्रतिनिधी)