शेताला आले तलाव स्वरूप

By Admin | Updated: November 18, 2014 23:01 IST2014-11-18T23:01:16+5:302014-11-18T23:01:16+5:30

शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून वर्धा नदीवर अप्पर वर्धा आणि निम्न वर्धा प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली; पण सध्या दोन्ही प्रकल्पातील दोषांमुळे शेतकऱ्यांना नुकसानच

Lake formation came to the farm | शेताला आले तलाव स्वरूप

शेताला आले तलाव स्वरूप

बुजलेल्या कालव्यामुळे पिकांचे नुकसान : भरपाईसाठी शेतकऱ्याचे हेलपाटे
तळेगाव (श्या़पं़) : शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून वर्धा नदीवर अप्पर वर्धा आणि निम्न वर्धा प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली; पण सध्या दोन्ही प्रकल्पातील दोषांमुळे शेतकऱ्यांना नुकसानच सहन करावे लागत आहे़ अद्याप अप्पर वर्धा प्रकल्पाच्या कालव्यांची कामेही पूर्ण झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतांना तलावाचे स्वरूप येत असून पिकांची धुळधान होत आहे़ या प्रकरणी चौकशी करून नुकसान भरपाई द्यावी व कालव्याची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़
शेत सर्व्हे क्ऱ ७९/१ मध्ये कालव्याचे पाणी शिरले आहे़ यामुळे शेताला तलावाचे स्वरूप आले आहे़ शेतात रमेश इंगळे रा़ आनंदवाडी या शेतकऱ्याने चना पेरला होता. कालव्याचे बांधकाम पूर्णपणे झालेले नाही़ कालव्याचे काँक्रीटींगही अद्याप करण्यात आलेले नाही़ कालवा पूर्णपणे बुजला आहे़ यामुळे कालव्याचे पाणी शेतात शिरून चना पिकाची पूर्णपणे धुळधान झाली आहे़ शेताच्या भरवशावरच इंगळे यांच्या कुटुंबाचे पालन-पोषण होते; पण शेतातील संपूर्ण पिकांचे नुकसान झाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
शेतात साचलेल्या पाण्याची कालवे विभागाचे गावंडे यांनी पाहणी केली़ उर्ध्व वर्धा डावा कालवा उपविभाग आर्वीच्या उपविभागीय अभियंत्यांनीही शेताची पाहणी करावी आणि नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी इंगळे यांनी निवेदनातून केली आहे़ शिवाय उर्वरित शेतही सिंचन विभागाने आपल्या ताब्यात घेऊन मोबदला द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे़ अप्पर वर्धा प्रकल्प विभागाने याची दखल घेत कारवाई करावी, अशी मागणी केली आहे़ सदर निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व आमदार अमर काळे यांनाही सादर करण्यात आल्या आहे़(वार्ताहर)

Web Title: Lake formation came to the farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.