टंचाईग्रस्त नागरिकांना पाणी वाटण्याचा ध्यास
By Admin | Updated: June 13, 2016 00:39 IST2016-06-13T00:39:17+5:302016-06-13T00:39:17+5:30
पाणीटंचाई निवारणार्थ शासनस्तरावर विविध योजना राबविण्यात येत आहे. पण यातील कित्येक योजना या केवळ कागदोपत्रीच राहतात.

टंचाईग्रस्त नागरिकांना पाणी वाटण्याचा ध्यास
मिशन पाणीटंचाई निराकरण : हिंगणघाट व आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा
हिंगणघाट : पाणीटंचाई निवारणार्थ शासनस्तरावर विविध योजना राबविण्यात येत आहे. पण यातील कित्येक योजना या केवळ कागदोपत्रीच राहतात. परिणामी नागरिकांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागतच आहे. ही बाब लक्षात घेत हिंगणघाट व आसपासच्या परिसरातील नागरिकांना मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी पाणी वाटण्याचा उपक्रम महाराष्ट्र दिनापासून हाती घेतला. आजतागायत अखंडपणे त्यांचे पाणीवाटप सुरूच आहे. त्यामुळे ते नागरिकांसाठी जलमित्रच ठरत आहे.
हिंगणघाट शहर आणि आसपासच्या गावांना पाणीटंचाईच्या झळा आजही सोसाव्या लागत आहे. शासन त्यांना पाणी देण्यास अकार्यक्षम ठरत आहे. त्यामुळे वांदिले यांनी ‘मिशन पाणी टंचाई निराकरण’ हा उपक्रमच सुरू केला. यासाठी त्यांनी चार टँकरची व्यवस्था केली. स्वत:च्या शेतातील विहिरीतून तसेच इतरही स्त्रोतांमधून पाणी मिळवून नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. यासाठी वॉर्डनिहाय कार्यकर्त्यांची स्वतंत्र फळी निर्माण केली. चालक व मदतनिसांच्या वेळा ठरवून दिल्या. शहरातील जवळपास प्रत्येक घरी भ्रमणध्वनी क्रमांक देत पाण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले. सकाळी ५.३० ते रात्री ११.३० पर्यंत अखंड पाणीवाटप ते करीत आहेत. यासाठी त्यांच्यासोबत प्रवीण श्रीवास्तव, राहुल सोरटे, सतीश झिलपे, अमोल भुसारी, अमोल बोरकर, सुनील भूते, रमेश घंगारे, राजू सिन्हा, किशोर चांभारे, नितीन भुते, सुशील घोडे, सोनू लांजेवार, नरेश चिरकुटे, गजानन कलोडे, अमित गावंडे परिश्रम घेत आहेत.(तालुका प्रतिनिधी)