जिल्ह्यातील पशुधनात घट
By Admin | Updated: October 22, 2014 23:23 IST2014-10-22T23:23:00+5:302014-10-22T23:23:00+5:30
पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. जनावरांच्या चारा-पाण्याची भेडसावणारी समस्या

जिल्ह्यातील पशुधनात घट
वर्धा : पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. जनावरांच्या चारा-पाण्याची भेडसावणारी समस्या जनावरांच्या घटीला कारणीभूत ठरत आहे. यामुळे शेतकरी, शेतमजुरांनी जनावरे मिळेल त्या भावात विक्रीचा सपाटा सुरू केल्याने गावरानी जनावरे कमी होत आहे. याचा परिणाम दुग्ध वुअवसायावरही होत आहे.
भारत देश कृषिप्रधान आहे. त्यामुळेच देशातील ९० टक्के जनता आजही कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. पूर्वी शेतीच्या मशागतीसाठी शेतकरी बैलांचा वापर करायचे. परिणामी शेतकऱ्यांचा जिवा-भावाचा सखा म्हणून बैलांची ओळख होती. या बैलांना जन्म देणारी गाय ‘गोमाता’ म्हणून ओळखली जाते. आता आधुनिक काळात विज्ञानाच्या प्रगतीमुळे यांत्रिक शेतीकडे शेतकरी वळत आहेत. सोबतच आता औताच्या सहाय्याने शेती करण्यासाठी ‘सालगडी’ मिळणे दुरापास्त झाले आहे. सालगड्यांचे वार्षिक वेतन दीड ते दोन लाखांवर पोहोचले आहे. परिणामी औताने शेती करणे शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे. त्यामुळे बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
पूर्वी शेतकऱ्यांची ओळखही किती ‘औताचा’ शेतकरी म्हणून होत होती. ज्या शेतकऱ्याजवळ जितके जास्त औत, तितका त्या शेतकऱ्यांचा दर्जा मोठा होता. तेच औत ओढण्यासाठी त्यांना बैलांची गरज होती. त्यामुळे पूर्वी शेतकऱ्यांच्या अंगणात बैलांची ‘दावण’ दिसणे, हे त्यांच्यासाठी भूषणावह होते. तथापि आता बैलांच्या जोड्या निर्माण करणाऱ्या गोमाताच नष्ट होत आहे.
विदर्भातील गावरानी बैल कष्टाळू बैल म्हणून ओळखले जातात. त्यांना पूर्वी अधिक मागणी होती. शेतकरी कधी काळी बैल व पाळीव जनावरांसाठी शेतात कुरण राखून ठेवायचे. आता कुरणेही नष्ट होत आहेत. पूर्वी शेतकरी म्हटला की, त्यांच्याकडे गायी, म्हशी पाळल्या जात होत्या. जनावरांपासून मिळणारे दूध, दही, लोणी, तूप शेतकऱ्यांच्या घरीच बनविले जात होते. एवढेच नव्हे तर सालदारांनाही त्याचे वाटप केले जात होते. त्यामुळे ग्रामीण भागात दूध-दुभते राहात होते. यापूर्वी शेतकऱ्यांसोबतच ग्रामीण भागातील शेतमजूर एखादी म्हैस किंवा गाय नाही, तर किमान एखादी बकरी तरी पाळत होते. त्यामुळे पूर्वी ग्रामीण भागात दुधाची धवलक्रांती होती. लग्नकार्यप्रसंगी लागणारे दूध, दही गावातच मिळत होते. सोबतच या पाळीव जनावरांच्या विष्ठेपासून उत्तम प्रकारचे शेणखत तयार होत होते. परिणामी शेतीचा ‘पोत’ ही सुधारत होता. रासायनिक खताची गरजही पडत नव्हती. प्रत्येक गावात दोन-चार गुराखी जनावरांचे कळप जंगलात चारायला नेत होते. आता जंगले नष्ट होऊ लागल्याने जनावरांना चारा मिळणे कठीण झाले आहे. उन्हाळ्यात नदी, नाले आटत असल्याने जनावरांना पिण्यासाठी व धुण्यासाठी पाणीही मिळत नाही. उन्हाळाभर म्हशींचे कळप नदी नाल्यात बसून दिसायचे, तेही दिसेनासे झाले आहे. जिल्ह्यातील चारा-पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी, मजुरांनी गेल्या १० वर्षात पाळीव जनावरे विकण्याचा सपाटाच सुरू केला. विक्रीस काढलेली जनावरे घेण्यास पुन्हा दुसरे शेतकरी व शेतमजूर उत्सुक नसतात. त्यामुळे आता दुधाळ व धष्टपुष्ट जनावरेसुध्दा दुसऱ्यालाच विकावी लागतात. परिणामी कत्तलखाने आता दुधाळ जनावरांनी भरलेले दिसतात. त्यामुळे ग्रामीण भागात दुग्ध उत्पादन कमी झाले आहे. पिशवीचे दुध विकत घेण्याची वेळ खुद्द शेतकऱ्यांवरच ओढवली आहे.(शहर प्रतिनिधी)