तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये सुविधांचा अभाव
By Admin | Updated: December 2, 2014 23:12 IST2014-12-02T23:12:24+5:302014-12-02T23:12:24+5:30
तालुक्यात आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य केंद्र असले तरी रुग्णांना सुविधांअभावी शहरातील आरोग्य केंद्राचा आधार घ्यावा लागत आहे़ यामुळे तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये सुधारणा कधी होणार,

तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये सुविधांचा अभाव
घोराड : तालुक्यात आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य केंद्र असले तरी रुग्णांना सुविधांअभावी शहरातील आरोग्य केंद्राचा आधार घ्यावा लागत आहे़ यामुळे तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये सुधारणा कधी होणार, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत़
सेलू तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्र, तीन आयुर्वेदिक केंद्र व एक ग्रामीण रुग्णालय आहे. ११० गावांचा समावेश असलेल्या तालुक्यात सेलू येथे गामीण रुग्णालय आहे; पण या रुग्णालयात रुग्णसंख्या पाहता वैद्यकिय अधिकारी व विविध विभागात तज्ज्ञांची कमतरता असल्याचे दिसते़ बहुतांश रुगणांना सावंगी व सेवाग्राम येथीेल रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात असल्याने ग्रामीण रुग्णालय सुविधांपासून वंचित असल्याचेच दिसून येते.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही़ कोणत्याही आरोग्य केंद्रात रुग्णांच्या नातलगांकरिता भोजनकक्ष व निवास व्यवस्था नाही. तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय सेलू येथे असून सदोदित वैद्यकीय अधिकाऱ्यांची वेळ निश्चित नसल्याचे बोलले जात आहे़ मोठ्या गावांत असलेल्या आरोग्य उपकेंद्रांपैकी बहुतांश उपकेंद्र रविवार व शनिवारी बंदच दिसून येतात़ गावोगावी आशा स्वयंसेविकांची नियुक्ती करण्यात आली असली तरी त्यांना मिळणारा कामाचा मोबदला हा अत्यल्प आहे. रुग्णवाहिकेवर असणारे वाहन चालक कंत्राटदारांवर अवलंबून आहे. २४ तास कामावर राहणाऱ्या वाहन चालकाला तुटपुंजे वेतन मिळत असल्याचे सांगितले जाते़
कुठे खाटांची व्यवस्था आहे तर बेडशिट मळलेल्या आहेत़ रुग्णांची संख्या वाढत आहे तर सेवा मिळत नाही. ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता रुग्णांना स्वत: रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. वैद्यकीय अधिकाऱ्याची कमतरता यास कारणीभूत आहे. शासनाने आरोग्य सेवा सुरळीत मिळावी म्हणून इमारती उभ्या केल्यात; पण रुग्णांना लागणाऱ्या सोयी-सुविधांचा अभावच ठेवल्याचे चित्र आहे. सोयी-सुविधांच्या कमतरतेमुळे रुग्णांना खासगी दवाखान्याचा आधार घेऊन भुर्दंड सोसावा लागत असल्याचे दिसते़ तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, ग्रामीण नागरिकांना खासगी दवाखान्यात जावे लागू नये, शासकीय रुग्णसेवेचा लाभ घेता यावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़(वार्ताहर)