मोझरी गावात मूलभूत सुविधांचा अभाव
By Admin | Updated: November 2, 2014 22:46 IST2014-11-02T22:46:48+5:302014-11-02T22:46:48+5:30
गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे येथील नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत लोकप्रतिनिधीं उदासीन असल्याने नागरिक वारंवार संताप व्यक्त करीत आहे.

मोझरी गावात मूलभूत सुविधांचा अभाव
मोझरी (शेकापूर) : गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे येथील नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत लोकप्रतिनिधीं उदासीन असल्याने नागरिक वारंवार संताप व्यक्त करीत आहे.
मोझरी(शेकापूर) गावाशी आजूबाजूच्या सात आठ गावांचा दररोजच्या दैनंदिन व्यवहारानिमित्त संबंध येतो़ तसेच पंचायत समिती सर्कलचे हे गाव असल्याने येथे वैद्यकीय दृष्ट्या आरोग्य केंद्र असणे आवश्यक आहे़ तरीही केवळ उपकेंद्राच्या भरवश्यावर येथील आरोग्यव्यवस्थेचा कारभार चालतो. तसेच तुटपुंज्या औषधासाठी तर अनेकदा साध्या बिमारीच्या औषधांचाही येथे तुटवडा असतो़ त्यामुळे मोझरीसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांना खासगी रुग्णालयाचा रस्ता पकडावा लागतो़
येथे अनेक वर्षापासून राष्ट्रीयकृत बँक शाखेची मागणी करण्यात येत आहे़ याबाबत राज्यमंत्र्यांनी आश्वासनही दिले होते़ परंतु अद्याप याबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाही़ परिणामी वृद्ध नागरिकांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करून बाहेरगावी जावे लागते़
त्याचप्रमाणे विद्युत बिल भरणा केंद्र नसल्यामुळे अनेकांना बिलाची तारीख कधी गेली व बाहेरगावी कधी जावून बिल भरावे याची अडचण भासत आहे़ तसेच परिसरातील नागरिकांनाही अडचण निर्माण होत आहे़ त्यामुळे येथे वीज बिल भरणा केंद्र देण्याची मागणी वारंवार होत आहे़
तसेच येथे केवळ एका लाईनमनच्या भरवश्यावर गावचा तसेच आजूबाजूच्या गावांचा कारभार चालतो़ सदर लाईनमन बाहेरगावावरून ये-जा करीत असल्याने रात्री बेरात्री विद्यूतपुरवठ्यात बिघाड आल्यास अंधारात रात्र काढावी लागते़ त्यामुळे येथे कमीतकमी दोन मुक्कामी पूर्णवेळ लार्ईनमन देण्यात यावे अशी मागणी होत आहे. अद्याप ती देखील पूर्णत्वास आली नाही़ येथून पाच दिशांना जाणारे रस्तेमार्ग आहेत़ त्यांचे पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून करण्यात आलेले काम हे अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाल्याने रस्ते उखडले आहे. मोझरी-कापसी या ६ कि़मी मार्ग तर स्वातंत्र्यापासून अद्यापपर्यंत दुर्लक्षितच आहे़ हा मार्ग लवकर पूर्णत्वास आणल्यास राळेगाव देवळी पुलगाव कमी वेळात गाठणे शक्य होणार आहे. बँक, विद्युत बिल भरणा केंद्र, आरोग्य केंद्र लाईनमन, रस्ते, आदी चांगल्या प्रकार उपलब्ध करण्याची मागणी वारंवार होत आहे़(वार्ताहर)