कारंजा पंचायत समितीला २२ शिक्षकांची कमतरता
By Admin | Updated: June 15, 2015 02:06 IST2015-06-15T02:06:44+5:302015-06-15T02:06:44+5:30
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ९५ प्राथमिक शाळा, २० खासगी माध्यमिक शाळा आणि १३ इंग्रजी कॉन्व्हेंट अशा एकूण १२८ शाळा आहेत.

कारंजा पंचायत समितीला २२ शिक्षकांची कमतरता
नियमित गटशिक्षणाधिकारी नाही : सर्व शिक्षा अभियानात होते तारांबळ
अरुण फाळके कारंजा (घा.)
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ९५ प्राथमिक शाळा, २० खासगी माध्यमिक शाळा आणि १३ इंग्रजी कॉन्व्हेंट अशा एकूण १२८ शाळा आहेत. या शाळांची प्रशासकीय देखभाल करण्यासाठी कारंजा पंचायत समितीच्या शिक्षण विभागात २०१३ पासून नियमित गटशिक्षणाधिकारी नाही. शिवाय २२ शिक्षकांचीही कमतरता आहे. यामुळे शिक्षण विभागाचा डोलारा कसा सांभाळला जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पंचायत समितीमध्ये एक विस्तार अधिकारी, एक वरिष्ठ सहायक आणि एक केंद्रप्रमुख तसेच २२ शिक्षक कमी आहे. या विपरित स्थितीत प्रभारी गटशिक्षणाधिकारी डी.बी. उमेकर हे आपल्या विस्तार अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळून संपूर्ण तालुक्यातील शिक्षण प्रशासनावर नियंत्रण ठेवणे तसेच सर्व शिक्षा अभियानाला गतीमान ठेवणे आदी कामे पार पाडत आहे. हे करीत असताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. उपलब्ध शिक्षक, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सोबत घेऊन डी.बी. उमेकर सर्व शिक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांच्या कार्यक्षमतेला मर्यादा आहेत. हे ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित कारंजा पंचायत समितीला कमी असलेले शिक्षक, कर्मचारी व नियमित अधिकारी उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे. तशी पालकांतूनही मागणी जोर धरत आहे.
कारंजा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९५ प्राथमिक शाळांकरिता २३५ शिक्षकांची पदे मंजूर आहेत; पण केवळ २१३ शिक्षक कार्यरत आहेत. तब्बल २२ शिक्षकांची कमतरता आहे. चार विस्तार अधिकाऱ्यांची, दोन वरिष्ठ सहायक आणि १० केंद्र प्रमुखांची पदे मंजूर असताना सध्या अनुक्रमे तीन, एक आणि नऊ कार्यरत असून एक विस्तार अधिकारी, एक वरिष्ठ सहायक आणि एक केंद्रप्रमुख कमी आहेत.
१ जुलै २०१३ रोजी गटशिक्षणाधिकारी बोलके यांची अमरावती येथे बदली झाली. तेव्हापासून आजपर्यंत कारंजा पंचायत समितीला नियमित गटशिक्षणाधिकारी मिळालेला नाही. पद रिक्त असून प्रभारी म्हणून विस्तार अधिकारी डी.बी. उमेकर कार्यभार सांभाळत आहेत. विस्तार अधिकारी आणि प्रभारी गटशिक्षणाधिकारी, अशी दुहेरी भूमिका व कामकाज सांभाळताना त्यांची तारांबळ उडत असल्याचे दिसते.
गतवर्षी ३० सप्टेंबर रोजी जि.प. शाळांची पटसंख्या ५ हजार ८१९ होती. पाल्यांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेशिक करण्याचा पालकांचा कल वाढला आहे. या विपरित परिस्थितीतही उमेकर यांनी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन प्रभावीपणे विशेष पालक संपर्क अभियान राबविले. यात मागील वर्षीची पटसंख्याच नव्हे तर वाढविणे हा त्यांचा प्रयत्न होता. यास प्रतिसादही चांगला मिळत आहे; पण कर्मचाऱ्यांची उणीव जाणवत असल्याचे दिसते. जि.प. शिक्षण विभागाने याकडे लक्ष देत कारंजा तालुक्यातील पदे भरणे गरजेचे झाले आहे.