कार व आॅटो अपघातात एक मजूर महिला ठार
By Admin | Updated: June 24, 2015 02:14 IST2015-06-24T02:14:08+5:302015-06-24T02:14:08+5:30
पुलगाव-आर्वी मार्गावर सोरटा बसस्थानकानजीक आॅटो व कारचा अपघात झाला. यात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्य तीन महिलांसह ...

कार व आॅटो अपघातात एक मजूर महिला ठार
चालकासह तीन महिला गंभीर : सोरटा बसस्थानकानजीकची घटना
पुलगाव : पुलगाव-आर्वी मार्गावर सोरटा बसस्थानकानजीक आॅटो व कारचा अपघात झाला. यात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्य तीन महिलांसह आॅटोचालकही गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
प्रभाताई मारोतराव मुसळे (४०) रा. गुंजखेडा असे मृतक महिलेचे नाव आहे. तर जखमीत आॅटो चालक भूषण राजेंद्र इंगोले (२२) रा. रसुलाबाद, शेतमजूर लता विजय कात्रे (३०) रा. गुंजखेडा, गौकर्णा नारायण गवई (४०) व शालू रूपराव राऊत (५०), दोन्ही रा. वल्लभनगर यांचा समावेश आहे. त्यांच्यावर वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार चालक प्रवीण दिलीप चोरे किरकोळ जखमी झाला.
पोलीस सूत्रानुसार, सकाळी आॅटो एमएच ३२-सी ६८३६ चा चालक भूषण इंगोले हा वल्लभनगर येथील महिला मजुरांना घेऊन रसुलाबाद येथे जात होता. यावेळी आर्वीहून पुलगावकडे भरधाव जात असलेल्या एमएच ३१- सीएन २९७९ क्रमांकाच्या कारने आॅटोला धडक दिली. यात कार आर्वीकडे जाणाऱ्या रेल्वे रूळावर फेकल्या गेली. या विचित्र अपघातात भूषण इंगोले, शेतमजूर लता कात्रे, गौकर्णा गवई, प्रभाताई मुसळे व शालू राऊत आदी गंभीर जखमी झाल्या. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले.
यात उपचारादम्यान प्रभाताई मुसळे यांचा मृत्यू झाला. तर इतर जखमींवर उपचार सुरू आहे. यात तीनही महिलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे; मात्र चालकाची प्रकृती अद्यापही अस्थिर असल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले. या प्रकरणी पुलगाव ठाण्यात गुन्हा दाखल आहे.(शहर प्रतिनिधी)