Kovid virus is making edible for 70-year-olds in the district | जिल्ह्यातील सत्तरी पार वृद्धांना कोविड विषाणू बनवितोय भक्ष्य

जिल्ह्यातील सत्तरी पार वृद्धांना कोविड विषाणू बनवितोय भक्ष्य

ठळक मुद्देसावधान; दिवसेंदिवस वाढतोय जिल्ह्यातील कोविड मृतांचा आकडा

वर्धा : नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे २४९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक ६१ ते ८० वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. कोविडची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पाश्वभूमीवर सदर वयोगटातील व्यक्तींनी आपले आरोग्य जपण्याची गरज आहे. कोविड संकट मोठे असून दक्ष राहण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देत आहेत. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी सध्या स्थितीत वर्धेकर गाफिल असल्यागत वागत आहेत. इतकेच नव्हे तर दररोज नवीन कोविड बाधित सापडण्याची गती सध्या वाढली असून दिवसेंदिवस कोविड मृतकांच्या संख्येतही वाढ होत असल्याने नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्यात ७ हजार ८९१ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याने निदान झाले आहे. त्यापैकी ७ हजार १६७ व्यक्ती कोविडमुक्त झाल्या आहे.

३७ व्यक्तींचा नोव्हेंबर मध्ये झाला मृत्यू

दिवाळीच्या तोंडावर विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. त्यानंतर सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. एकट्या नोव्हेंबर महिन्याचा विचार केल्यास ३० दिवसांत जिल्ह्यात १,५७१ नवीन कोविड बाधित आढळले. तर १,३२२ रुग्ण कोविडमुक्त झाले असले तरी तब्बल ३७ व्यक्तींचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे, हे विशेष.

कोरोनाने बुधवारी घेतला ७० वर्षीय महिलेचा बळी
 बुधवार २ डिसेंबरला वर्धा तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आज एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्याची कोविड मृतकांची संख्या आता २५१ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ४८७ ॲक्टिव्ह कोविड पॉझिटिव्ह आहेत.

शहरी भागात कोविड  मृतांची संख्या जास्तच
 मंगळवार १ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील तब्बल २५० व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यापैकी एका व्यक्तीचा इतर आजाराने मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागांकडून सांगण्यात येते. 
 कोरोना मृतांची जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असून शहरी भागात कोविड मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात शहर पातळीवर प्रभावी जनजागृतीसाठी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे प्रत्येक मृतकांची जिल्ह्यात कोविड चाचणी केली जात आहे.

Web Title: Kovid virus is making edible for 70-year-olds in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.