ज्ञानातूनच सुसभ्य समाजाची निर्मिती होते
By Admin | Updated: July 2, 2014 23:25 IST2014-07-02T23:25:56+5:302014-07-02T23:25:56+5:30
ज्ञान वितरित केल्याने ज्ञान वाढते व ज्ञानातूनच सुसभ्य समाजाची निर्मिती होते. म्हणून स्वत:चा, समाजाचा आणि देशाचा विकास करण्यासाठी शिक्षित व सुसंस्कारित समाजाची आवश्यकता आहे,

ज्ञानातूनच सुसभ्य समाजाची निर्मिती होते
वर्धा : ज्ञान वितरित केल्याने ज्ञान वाढते व ज्ञानातूनच सुसभ्य समाजाची निर्मिती होते. म्हणून स्वत:चा, समाजाचा आणि देशाचा विकास करण्यासाठी शिक्षित व सुसंस्कारित समाजाची आवश्यकता आहे, असे विचार बौद्ध धम्मगुरू भदन्त आर्य नागार्जून सुरई ससाई यांनी व्यक्त केले.
डॉ. आंबेडकर कॉलेज आॅफ सोशल वर्क येथे सर्वसोयीयुक्त सुभेदार रामजी आंबेडकर कम्यूनिटी लायब्ररीचे उद्घाटन भदन्त सुरई ससाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते़ कार्यक्रमाला भूजल सर्वेक्षण विभागाचे वैज्ञानिक त्रिलोक हजारे, प्रा. बोधी, डॉ. चेतना सवाई, भन्ते धम्मसागर, राही गायकवाड, प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई उपस्थित होते. बहुजन समाजातील विद्यार्थी व नागरिकांनी या लायब्ररीचा लाभ घेऊन आपले ज्ञान वाढविण्याचे आवाहन डॉ. चेतना सवाई यांनी केले़ भदन्त धम्मसागर यांनी डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत शिक्षित समाजाची रचना निर्माण करण्यासाठी अशा लायब्ररीची गरज असल्याचे सांगितले. वरिष्ठ भूवैज्ञानिक त्रिलोक हजारे यांनी युवकांना स्पर्धेच्या जगात आपले स्थान निर्माण करण्यासाठी भरपूर वाचन करावे, असा सल्ला दिला.
डॉ. आंबेडकर कॉलेज आॅफ सोशलवर्कमध्ये अत्याधुनिक व्यवस्थेसह क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व इथोथीथास अय्यंकाली संशोधन केंद्राचेही उद्घाटन भन्ते सुरई ससाई यांनी केले. याप्रसंगी टाटा इन्स्टीट्यूट आॅफ सोशल सायन्सेस मुंबईचे प्रा. बोधी, निलेश थूल, अतुल आनंद, मुकेश शेंडे, सुकन्या शेट्टी, राही गायकवाड, मिशिगन युनिवर्सीटी अमेरिका येथील ताहा अब्दुल रोफ, केरळचे जी.आय. सॅम्युअल, चेन्नईचे चंद्रशेखर, जोशुआ इसाक, हिंदी विद्यापीठाचे अभय तायडे, अवधेश कुमार व लायब्ररीचे संचालक जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्लीचे अनुपकुमार यांनी स्पर्धा परीक्षा व संशोधनाबाबत मार्गदर्शन केले.
या केंद्रातून बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे निशुल्क मार्गदर्शन केले जात आहे. सोबतच संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व विदेशात शिकण्याची तयारी आणि इतर स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी टाटा समाजविज्ञान संस्था मुंबई, दिल्ली विद्यापीठ, हैद्राबाद विद्यापीठ व चेन्नईचे विद्वान शिक्षक मार्गदर्शन करतील. या लायब्ररीमध्ये भारतात प्रकाशित होणारे सर्व जर्नल्स, वर्तमानपत्रे व भरपूर साहित्य आणि पुस्तके उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या लायब्ररीमध्ये सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्व नागरिकांना नि:शुल्क प्रवेश असून याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक अनुपकुमार दिल्ली व डॉ. चेतना सवाई यांनी केले. यावेही प्राध्यापक, कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)