पोलीसदादाला आली जखमी वासराची दया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 21:50 IST2018-08-06T21:49:56+5:302018-08-06T21:50:25+5:30
पोलीस म्हटले की कठोर मनाचेच असे बोलले जाते. परंतु, त्यांच्यातही दया कायम असल्याचे चित्र सेलूकरांना बघावयास मिळाले. अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वासरावर पोलीस दादांनी सामाजिक बांधिलकी जोपासत प्रथमोपचार करून जणू त्याला त्याच्या दु:खाच्या प्रसंगी धीरच दिला.

पोलीसदादाला आली जखमी वासराची दया
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : पोलीस म्हटले की कठोर मनाचेच असे बोलले जाते. परंतु, त्यांच्यातही दया कायम असल्याचे चित्र सेलूकरांना बघावयास मिळाले. अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वासरावर पोलीस दादांनी सामाजिक बांधिलकी जोपासत प्रथमोपचार करून जणू त्याला त्याच्या दु:खाच्या प्रसंगी धीरच दिला.
सेलू पोलीस ठाण्यासमोर भरधाव असलेल्या अज्ञात वाहनाने एका वासराला जबर धडक दिली. या अपघातानंतर सदर वाहनचालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. परंतु, जखमी वासरू जीवाच्या आकांताने तडफड होते. घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. मात्र, या मुक्या जनावराच्या मदतीसाठी कुणीच पुढे येण्यास तत्पर्ता दाखवित नव्हते. अशातच सदर बाब सेलू पोलिसांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच जखमी वासराला ताब्यात घेत त्यास उचलून ठाण्याच्या आवारात आणले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करीत पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जोपासत त्यास पाणी पाजले. शिवाय वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून त्याच्यावर उपचार करीत जखमी वासराला जणू धीरच दिला. तपासणी अंती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वासराचे हाड मोडल्याचे सांगितले. जखमी वासराला मदत करण्यासाठी जमादार रवींद्र खरे, वामन घोडे, विनोद वानखेडे, मंगेश वाघाडे आदींनी सहकार्य केले.