अंबागडे खून प्रकरणातील मारेकरी गवसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 05:00 IST2020-10-10T05:00:00+5:302020-10-10T05:00:33+5:30
घटनेच्या दिवशी मृतक जगदीश अंबागडे हा त्याच्या दुचाकी वाहन क्र. एमएच ३२ एबी १७०३ ने साळ्याच्या ढाब्यावर लागणारे काही साहित्य घेऊन जात असताना वाटेतच या दोन्ही आरोपींनी त्याला अडविले. जगदीशच्या खिशातील रक्कम त्यांनी हिसकावून घेतली. याची वाच्यता गावात जाऊन करू नये म्हणून जगदीशची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आरोपी दीपक वसंता चचाने व सुनील अशोक राऊत या दोन्ही मारेकऱ्यांनी सेलू पोलिसांना दिली.

अंबागडे खून प्रकरणातील मारेकरी गवसले
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : येथील जगदीश अंबागडे (४३) यांची मंगळवारी रात्री १० वा. साळ्याच्या ढाब्यावर लागणारे काही साहित्य पोहोचविण्याकरिता जात असताना वाटेत अडवून मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना दुसऱ्या दिवशी ७ ऑक्टोबर सकाळी उघडकीस आल्यानंतर त्याच दिवशी रात्री केळझर येथील दीपक वसंता चचाने (३०) याला नागपूर जिल्ह्यातील बनवाडी येथील त्याच्या सासऱ्याच्या घरून सेलू पोलिसांनी ताब्यात घेतले. तर दुसरा मारेकरी सुनील अशोक राऊत (३०) रा. गोहदा (हिंगणी) हा केळझर येथे आला असल्याच्या माहितीवरून सेलू पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांचीही कसून चौकशी केली असता त्यांनी जगदीश अंबागडे याची हत्या केल्याचे कबूल केले. या दोघाही मारेकऱ्यांना १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
घटनेच्या दिवशी मृतक जगदीश अंबागडे हा त्याच्या दुचाकी वाहन क्र. एमएच ३२ एबी १७०३ ने साळ्याच्या ढाब्यावर लागणारे काही साहित्य घेऊन जात असताना वाटेतच या दोन्ही आरोपींनी त्याला अडविले. जगदीशच्या खिशातील रक्कम त्यांनी हिसकावून घेतली. याची वाच्यता गावात जाऊन करू नये म्हणून जगदीशची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आरोपी दीपक वसंता चचाने व सुनील अशोक राऊत या दोन्ही मारेकऱ्यांनी सेलू पोलिसांना दिली. तसेच हत्या केल्यानंतर मृतकाची दुचाकी घेऊन मारेकऱ्यांनी पळ काढला. दुचाकी त्यांनी कुठे नेऊन ठेवली, याचा तपास सेलू पोलीस करीत आहेत. पोलिसांनी हत्येच्या सर्व पैलूंचा तपास सुरू केला आहे.
आरोपी कुख्यात गुन्हेगार
यातील सुनील अशोक राऊत हा कुख्यात गुन्हेगार असून त्याने नऊ वर्षांपूर्वी येथील सामाजिक वनीकरणाच्या नर्सरीत चौकीदार असलेले मोरेश्वर बारस्कर (६७) यांची हत्या केली होती. याप्रकरणी तो शिक्षाही भोगून आला. केळझरला गावात आल्यानंतर तो दुचाकी वाहने व सायकल चोरी , दुकाने फोडून चोरी करणे आदी गुन्ह्यात सहभागी होता. त्यामुळे गावात सुनील राऊत याला ‘डकेत’ म्हणून ओळखत होते. हिंगणी परिसरातही त्याने अनेक चोऱ्या केल्याचे सांगितले जात आहे. कुख्यात आरोपी सुनील राऊत याच्याकडून ही दुसरी हत्येची घटना घडली आहे. या हत्येप्रकरणी आणखी काही माहिती हाती येते काय, याची चौकशीं सेलू पोलिस करीत आहेत.