खरीपाकरिता हवे ७0 हजार मेट्रीक टन खत
By Admin | Updated: May 15, 2014 23:50 IST2014-05-15T23:50:08+5:302014-05-15T23:50:08+5:30
मान्सून जवळ येत आहे. यात खरीपाच्या पेरणीकरिता शेतकर्यांनी मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. शेतकर्यांच्या कामांची गती वाढत असताना कृषी विभागाच्यावतीनेही

खरीपाकरिता हवे ७0 हजार मेट्रीक टन खत
वर्धा : मान्सून जवळ येत आहे. यात खरीपाच्या पेरणीकरिता शेतकर्यांनी मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. शेतकर्यांच्या कामांची गती वाढत असताना कृषी विभागाच्यावतीनेही आढावा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात यंदा होत असलेल्या पेर्याच्या तुलनेत खरीप हंगामाकरिता ७0 हजार मेट्रीक टन खतांची गरज आहे. शेतीच्या मशागतीच्या कामांना शेतकर्यांनी गती दिली आहे. यात ज्यांची आर्थिक सोय आहे त्यांनी बियाण्यांची व खतांची खरेदी सुरू केली आहे तर ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांनी पैशाची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू केले आहे. काही शेतकरी पेरणी करतेवेळीच खताची मात्रा देतात. तर काही पेरणी झाल्यानंतर खताचा वापर करतात. यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच खतांची मागणी वाढते. यामुळे खतांचा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकर्यांना आवश्यक असलेल्या खतांसोबत लिकींग झाल्याने शेतकर्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असल्याचे समोर आले आहे. या हंगामात जिल्ह्यात चार लाख हेक्टरवर खरीपाचा पेरा होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्यावतीने वर्तविण्यात आला आहे. याकरिता एकूण ७0 हजार ४00 मे. टन खतांची गरज भासणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आवश्यक असलेल्या खताची मागणी जिल्हा कृषी विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात ३२ हजार मेट्रीक टन खत उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यात शेतकर्यांना पेरणीनंतर अत्यावश्यक असलेला युरीया २0 हजार मेट्रीक टनाच्या आसपास आहे. यामुळे शेतकर्यांना चिंता करण्याची गरज नसल्याचे कृषी विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)