शेतकऱ्यांसमोर खरीप नियोजनाचे संकट
By Admin | Updated: April 30, 2015 02:00 IST2015-04-30T02:00:15+5:302015-04-30T02:00:15+5:30
तीन वर्षापासून तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नापिकी, दुष्काळी परिस्थिती व अवकाळी पावसाने थैमान

शेतकऱ्यांसमोर खरीप नियोजनाचे संकट
सुरेंद्र डाफ आर्वी
तीन वर्षापासून तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नापिकी, दुष्काळी परिस्थिती व अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. गत वर्षीचा दुष्काळ नापिकी व अपेक्षित उत्पादनाने शेतकऱ्यांना दिलेली हुलकावणी या नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर दीड महिन्यावर येऊन पोहोचलेल्या खरीप हंगामाचे नियोजन कसे करावे या चिंतेने बळीराजा ग्रासला आहे.
गत वर्षीच्या खरीप हंगामामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे कोसळलेले नैसर्गिक संकट व ओला दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, कापूस आदी शेतमालाचे अपेक्षित उत्पादन झाले नाही. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. सप्टेंबर ते नोव्हेंबर १४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतपिकाचे नुकसान झाले. यात गारप्पिटीने व खरडलेल्या शेतजमिनीची नुकसान भरपाई देण्यात आली; मात्र यातही गोंधळ होऊन अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्यापही शासनाच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. येणाऱ्या हंगामाची तयारी करण्याकरिता शेतकऱ्यांची आर्थिक सोय नाही. शिवाय बँकेकडून कर्ज देण्यासही टाळाटाळ होत आहे. यामुळे येणाऱ्या हंगामात पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून येणारा खरीप हंगाम कसा करावा अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे.