सुरगाव मार्गावर खड्डाराज
By Admin | Updated: October 7, 2016 02:23 IST2016-10-07T02:23:07+5:302016-10-07T02:23:07+5:30
पवनार येथून सुरगाव कडे जात असलेल्या मार्गाची या काही वर्षांत पूर्णत: दैना झाली आहे. सदर रस्ता वडगाव

सुरगाव मार्गावर खड्डाराज
अपघात बळावले : रस्त्याची पक्की डागडुजी करण्याची मागणी
वर्धा : पवनार येथून सुरगाव कडे जात असलेल्या मार्गाची या काही वर्षांत पूर्णत: दैना झाली आहे. सदर रस्ता वडगाव, रेहकी आदी गावांनाही जोडत असल्याने या मार्गावर वर्दळ जात असते. पण मोठमोठ्या खड्ड्यामुळे या मार्गावर सध्या अपघाताची मालिका तयार झाल्याने प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत.
नागपूर मार्गावर पवनार पासून सुरगाव मार्ग काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. या मार्गावर दोन्ही गावातील ग्रामस्थांची शेती असल्याने हा मार्ग शेतकऱ्यांसाठी सोयीचा आहे. या रस्त्याचे पक्के डांबरीकरण करण्यात आले होते. पण सातत्याने वाहतूक होत असल्याने सदर रस्त्याची लवकरच ठिकठिकाणी दैना झाली. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्ता उखडून ठिकठिकाणी अपघातप्रवण स्थळ तयार झाले. त्यामुळे हा मार्ग पार करताना शेतकरी मेटाकुटीस आले आहे.
हा मार्ग वळणावळणाचा आहे. त्यातच ठिकठिकाणी झुडपी झाडांमुळे रस्ता झाकोळला गेला आहे. परिणामी समोरून येणारी वाहने दिसून येत नाही. परिणामी अपघाताची शक्यताही वाढली आहे. शेतांमधील पाणी रस्त्यावर येत असल्यानेही ठिकठिकाणी या रस्त्यावर तळे साचले आहे. त्यामुळे या मार्गाचे नव्याने पक्के बांधकाम व्हावे अशी मागणी शेतकरी व प्रवासी करीत आहे.(शहर प्रतिनिधी)