अपक्षाच्या हाती खुर्चीची किल्ली
By Admin | Updated: July 16, 2014 00:20 IST2014-07-16T00:20:37+5:302014-07-16T00:20:37+5:30
सिंदी(रेल्वे) नगर पालिकेत असलेल्या विविध पक्षाच्या सदस्यांना नगराध्यक्ष बनण्याकरिता अपक्ष उमेदवाराची मदत घेणे अत्यावश्यक आहे. यामुळे सिंदी (रेल्वे) येथील नगराध्यक्ष अपक्ष उमेदवार

अपक्षाच्या हाती खुर्चीची किल्ली
प्रशांत कलोडे - सिंदी (रेल्वे)
सिंदी(रेल्वे) नगर पालिकेत असलेल्या विविध पक्षाच्या सदस्यांना नगराध्यक्ष बनण्याकरिता अपक्ष उमेदवाराची मदत घेणे अत्यावश्यक आहे. यामुळे सिंदी (रेल्वे) येथील नगराध्यक्ष अपक्ष उमेदवार ठरणार असल्याचे शहरात बोलले जात आहे. असे असले तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे उमेदवार नगराध्यक्षाच्या खुर्चीवर डोळा
ठेवून आहेत.
सदस्य संख्या १७ असलेल्या या पालिकेच्या विद्यमान नगराध्यक्षाचा कालावधी पुढील आठवड्यात संपणार आहे. सध्या नगराध्यक्ष म्हणून महिला उमेदवार आहे तर आरक्षणानुसार पुन्हा येथे महिला राजच येणार आहे. यामुळे विविध पक्षात असलेल्या महिलांनी आपण नगराध्यक्ष होवू शकतो, असे म्हणत फिल्डींग लावणे सुरू केले आहे. नगराध्यक्षपद आपणास मिळावे यासाठी आतापासून फिल्डींग लावून काही नगरसेवक सहलीला गेले आहेत.
नगर पालिकेत सध्या नगराध्यक्षपद भाजपकडे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे उपाध्यक्षपद आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व एक अपक्ष नगरसेवक अशी सत्ता सध्या पालिकेत आहे. कॉंग्रेसकडे एकूण आठ सदस्य आहेत. यामुळे नव्या निवडीतही हीच युती कायम राहते अथवा नवे समीकरण तयार होते हे अपक्ष नगरसेवक अशोक कलोडे यांच्यावर अवलंबून आहे. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व एक अपक्ष उमेदवार यांची आघाडी निर्माण करून पहिल्या अड्डीच वर्षासाठी भाजपाच्या पुष्पा सोनटक्के यांना नगराध्यक्षपद देण्यात आले होते. पुढील अड्डीच वर्षांकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हमीदा शेख इद्रिस यांना नगराध्यक्षपदी बसवायचे, असे युतीच्यावेळीच ठरले होते.
सध्या अपक्ष नगरसेवक अशोक कलोडे यांनी आपला पाठिंबा भाजपा, राष्ट्रवादी युतीला न देता कॉंग्रेसला देण्याचा मानस व्यक्त केल्याने जुने गणित बिघण्याचा अंदाज आहे. काँग्रेसतर्फे सुनिता गंगाधर कलोडे यांना नगराध्यक्ष पद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यामुळे येथील गटनेत्याने काँग्रेसच्या नगरसेवकांना सहलीकरिता रवाना केले आहे. यातील एक महिला सदस्य मात्र गावातच आहे. त्यांना भाजप व राष्ट्रवादीच्यावतीने नगराध्यक्ष पदाचे गाजर दाखवून थांबविण्यात आल्याची चर्चा जोर धरत आहे. जुनी युती तुटण्याचे संकेत असल्याने दुसरा पर्याय म्हणून भाजपाच्या नगरसेविका जिजा तळवेकर यांना समोर करून भाजपाचे चार, राष्ट्रवादीचे चार व काँग्रेसची एक नगरसेविका असे मिळून नगर पालिकेत सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. काँग्रेसची एक महिला नगरसेविका इतर सात सदस्यांसोबत न जाता गावातच थांबवल्याने नगराध्यक्ष पदासाठी काय घडामोडी होतात याकडे सिंदीवासीयांचे लक्ष लागले आहे.