मृत मुलीच्या न्यायासाठी केविलवाणी धडपड

By Admin | Updated: December 20, 2014 01:57 IST2014-12-20T01:57:00+5:302014-12-20T01:57:00+5:30

१८ वर्षांपूर्वी लहान मुलाचा मृत्यू झाला. आठ वर्षांपूर्वी मोठा मुलगा मरण पावला. पाच वर्षांपूर्वी कपाळाचे कुंकूही पुसल्या गेले.

Kevilani challenge for the murder of a dead girl | मृत मुलीच्या न्यायासाठी केविलवाणी धडपड

मृत मुलीच्या न्यायासाठी केविलवाणी धडपड

वर्धा : १८ वर्षांपूर्वी लहान मुलाचा मृत्यू झाला. आठ वर्षांपूर्वी मोठा मुलगा मरण पावला. पाच वर्षांपूर्वी कपाळाचे कुंकूही पुसल्या गेले. आता उरलेल्या एकुलत्या एक मुलीचा तिच्या माहेरच्या मंडळींनी सासूरवास देत बळी घेतला. दु:खाशिवाय कुणाचीही साथ नाही. शरीरही थकलेले असले तरी मुलीला न्याय देण्यासाठी ‘त्या’ माऊलीची सुरू असलेली केविलवाणी धडपड दगडालाही पाझर फोडणारी आहे. उषा विठ्ठल हांडे रा. हिंगणघाट असे या दुर्दैवी आईचे नाव आहे.
तिच्या मुलीचे नाव गिता. वय ३० वर्षे. तिचा विवाह पिपरी(मेघे) येथील अरविंद भोयर याच्यासोबत झाला. तिला एक आठ आणि एक सहा वर्षांचा अशी दोन अपत्ये आहेत. लग्न झाले तेव्हापासूनच गिताला सासरच्या मंडळींचा त्रास होता. अशातच गिता मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायची. पती आयतोबा म्हणून तिने कमावलेल्या पैशावर आपले शौक पूर्ण करायचा. गिताला क्षुल्लक कारणावरून तो जनावरासारखे मारायचा. या मारहाणीमुळे गिताला अनेकदा रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. मात्र तिच्याजवळ घरातील एकही मंडळी राहात नव्हती. गिताने ही व्यथा अनेकदा आपल्याला सांगितली. तिला घरच्या मंडळींचा जाच असह्य झाला होता. पोलीस ठाण्यात जाण्याचीही मुभा नव्हती. ती आपली व्यथा नेहमी मोबाईवर सांगायची. अशातच तिला लपून छपून भेटून तिचे दु:ख हलके करीत होती. काळाने मुलेही हिरावले आणि कुंकूही पुसले. घरात कुणी धावणारे नाही. अशातच २५ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता गिताच्या मृत्यूचीच बातमी आली. तिला आजार होता. मात्र तिचा मृत्यू आजाराने नाही, तर तिच्या सासरच्या मंडळींनी तिचा बळी घेतला, हे सांगताना या माऊलीला गहिवरुन आले. तिच्याकडे कुठलाही पुरावा नाही, मात्र मुलीची हत्या झाली हे ती छातीठोकपणे सांगत आहे. मुलीचा पती माझे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही, या अविर्भावात वावरत आहे. पोलिसांनी कायद्याच्या चौकटीतून माणुसकीच्या नात्याने न्याय द्यावा, इतकीच अपेक्षा या माऊलीने यावेळी बोलून दाखविली.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Kevilani challenge for the murder of a dead girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.