काटोलकरला अटक करणारच!
By Admin | Updated: October 12, 2015 02:20 IST2015-10-12T02:20:09+5:302015-10-12T02:20:09+5:30
येथील जिल्हा परिषदेत झालेल्या कथित विशेष शिक्षक भरती प्रक्रीयेत भ्रष्टाचाराचा आरोप असलेला शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकरला जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.

काटोलकरला अटक करणारच!
ठाणेदारांची माहिती : शिक्षक पदभरती घोटाळा प्रकरण
वर्धा : येथील जिल्हा परिषदेत झालेल्या कथित विशेष शिक्षक भरती प्रक्रीयेत भ्रष्टाचाराचा आरोप असलेला शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकरला जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. यामुळे आता त्याला अटक होणे अटळ आहे. मात्र वर्धा शहर पोलिसांकडून त्याच्या अटकेसंदर्भात हयगय होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सदर प्रकरणात शहर पोलीस मॅनेज झाल्याची चर्चा जि.प.च्या आवारात जोर धरत आहे. मात्र काटोलकरला अटक करणारच असे शहर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे
जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानात झालेल्या विशेष शिक्षक भरती प्रक्रीयेत शिक्षणाधिकाऱ्याने उत्तर पत्रिका बदलविल्याची तक्रार जि.प. मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी शहर पोलिसात केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकरने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासंदर्भात अर्ज दाखल केला होता. तो न्यायालयाने फेटाळला. यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली. तिथेही जामीन मिळणार नसल्याचे दिसून आल्याने त्याने गुरुवारी याचिका मागे घेतली. यामुळे आता काटोलकर याची अटक अटळ आहे.
तपासाकरिता जिल्हा न्यायालयात त्याची याचिका रद्द करण्याची मागणी करणारे वर्धा पोलीस आता मात्र त्याच्या अटकेसंदर्भात गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे पोलीस काटोलकरच्या प्रकरणात मॅनेज झाल्याची चर्चा जि.प.च्या आवारात आहे. या संदर्भात शहर ठाण्याचे निरीक्षक बुराडे यांना विचारले असता त्यांनी सध्या शहरात नवरात्रोत्सवाचा बंदोबस्त असल्यामुळे याकडे विशेष लक्ष नाही. अशातही थांगपत्ता लागताच त्याला अटक करण्यात येईल, असे ते म्हणाले. काटोलकरला पोलीस केव्हा अटक करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)