भाजपातर्फे वर्धेच्या उमेदवारीवर काथ्याकुट

By Admin | Updated: September 27, 2014 02:07 IST2014-09-27T02:07:57+5:302014-09-27T02:07:57+5:30

युतीत फाटाफूट झाल्यानंतर वर्धा मतदार संघातील जुने समीकरण जागीच गळून पडले आहे.

Kathyakut on BJP candidate's candidature for Wardha | भाजपातर्फे वर्धेच्या उमेदवारीवर काथ्याकुट

भाजपातर्फे वर्धेच्या उमेदवारीवर काथ्याकुट

वर्धा : युतीत फाटाफूट झाल्यानंतर वर्धा मतदार संघातील जुने समीकरण जागीच गळून पडले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत भाजप माजी खासदार दत्ता मेघे यांचे कट्टर समर्थक डॉ. पंकज भोयर यांचे नाव अग्रक्रमावर असताना भाजपश्रेष्ठींनी त्यांना डावलून येळाकेळी जि.प. गटाचे सदस्य राणा रणनवरे यांना उमेदवारी बहाल केल्यामुळे डॉ. भोयर यांचा हिरमोड झाला आहे. यामुळे भाजपाकडून या उमेदवारीबाबत पुन्हा फेरविचार सुरू झाल्याची माहिती आहे.
दत्ता मेघे यांनी भाजपात प्रवेश केला. तेव्हाच युवा कार्यकर्त्यासह डॉ. पंकज भोयर यांनी त्यांचा हात धरून भाजप प्रवेश घेतला. या प्रवेशानंतर भोयर यांचा आमदारकीवर डोळा होता. तेव्हापासूनच त्यांनी वर्धा विधानसभा मतदार संघावर आपले लक्ष्य केंद्रीत करून उमेदवारी मिळविण्याच्या अनुषंगाने भाजपश्रेष्ठींकडे फिल्डींग लावली होती. दुसरीकडे राणा रणनवरे यांच्यासह श्याम गायकवाड हे देखील रांगेत होते. मात्र यात भोयर यांचे नाव भाजपच्या यादीत अग्रक्रमावर असल्याची चर्चाही भाजप गटात होती. अशातच वर्धा जि.प. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली.
जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आली. यामध्ये भाजपाने राणा रणनवरे यांच्या पत्नी हिंगणी जि.प. गटाच्या सदस्या चित्रा रणनवरे यांना अध्यक्षपदी विराजमान केले. तेव्हापासून राणा रणनवरे यांच्या नावाची विधानसभा उमेदवारीसाठी सुरू असलेली चर्चा थांबली. भाजप-सेना युती तुटण्याच्या दिवसापर्यंत भोयर यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल, असे बोलले जात होते.
मात्र रात्रीला नागपूरात झालेल्या अंतर्गत घडामोडीनंतर एकाएकी डॉ. पंकज भोयर यांना वगळून राणा रणनवरे यांच्या नावावर भाजप श्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले. याला रणनवरे यांनीही दुजोरा दिला. यामुळे वर्धेतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भोयर यांनी दोन महिन्यांपासून वर्धा मतदार संघ पिंजून काढला होता. इतकेच नव्हे, तर पक्षाचे चिन्ह असलेले मतदार कार्ड देखील मतदारांपर्यंत पोहचविले होते. अशातच भाजपकडून रणनवरे यांचे नाव पुढे आल्यामुळे नाराजीचा सूर उमटायला सुरूवात झाली. ही बाब लक्षात येताच भाजपश्रेष्ठी या निर्णयावर फेरविचार करीत असल्याची भारतीय जनता पक्षाच्या गोटातील माहिती आहे.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Kathyakut on BJP candidate's candidature for Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.