महिलांचे प्रेरणास्थान ठरलेल्या कस्तुरबा
By Admin | Updated: February 22, 2017 00:48 IST2017-02-22T00:48:41+5:302017-02-22T00:48:41+5:30
कस्तुरबा गांधी यांची पुण्यतिथी मातृदिन म्हणून साजरी केली जाते. गांधीजींशी बालवयात विवाह झाल्यानंतर सामाजिक कार्यात गांधीजींनी स्वत:ला वाहून घेतले.

महिलांचे प्रेरणास्थान ठरलेल्या कस्तुरबा
स्मृतीदिन विशेष : भारत छोडोच्या नेतृत्वातून नवा आदर्श
दिलीप चव्हाण सेवाग्राम
कस्तुरबा गांधी यांची पुण्यतिथी मातृदिन म्हणून साजरी केली जाते. गांधीजींशी बालवयात विवाह झाल्यानंतर सामाजिक कार्यात गांधीजींनी स्वत:ला वाहून घेतले. बापूंचेच नव्हे तर ‘बा’चे वैयक्तिक जीवन संपुष्टात येऊन आश्रमीय जीवन पद्धती अंगिकारली. यातून अनेक त्याग त्यांना करावा लागला; पण या त्यागातूनच त्यांचे जीवन राष्ट्रीय व स्वातंत्र्याच्या कामी आले. स्वातंत्र्य चळवळीत महिलांचे प्रेरणास्थान बनून आंदोलकांमध्ये स्फुलिंग निर्माणाचे काम त्यांनी केले.
१९४२ च्या भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व करून जगापुढे नवा अहिंसक क्रांतीकारी आदर्श कस्तुरबा यांनी ठेवला. सेवाग्राम आश्रमात राहण्याचे भाग्य बा यांना केवळ सहा वर्षाचे लाभले; पण या आश्रमातील कार्यकर्त्यांना मातृव्रत प्रेम देऊन संस्कारासोबत घडविण्याचे कार्य बा यांनी केले. स्त्रीचे गुण व मूल्य जोपासणाऱ्या कस्तुरबा यांनी मात्र संयमाने विरतापूर्ण ब्रिटीश साम्राज्याशी लढा देण्याचे अलौकिक कार्य केले. अशा मातृहृदयी बा चे पुण्यातील आगाखाँ पॅलेसमध्ये २२ फेबु्रवारी १९४४ रोजी बंदिवासातच निधन झाले. त्यांची आज ७३ वी पुण्यतिथी आहे.
कस्तुरबांचा विवाह वयाच्या १३ व्या वर्षी झाला. त्या बापूपेक्षा सहा महिन्यांनी मोठ्या होत्या. त्या अशिक्षित असल्या तरी संस्कारी होत्या. बापूंच्या पावलावर पाऊल टाकून त्या चालल्या. धार्मिक वृत्तीच्या कस्तुरबांना बापूंनी वाचायला व लिहायला शिकविले. एवढेच नव्हे तर आपल्या गुरूस्थळी पतीपासून कामापूरती इंग्रजी भाषाही शिकल्या. यावरून शिक्षण व शिकण्याची आवड व धडपड दिसून येते. १९०६ मध्ये बापूंनी ब्रह्मचारी व्रत स्वीकारले आणि कस्तुर या नावाच्या पाठीमागे ‘बा’ लागून कस्तुरबा, असे झाले. गांधीजी समवेत आश्रमच नव्हे तर देशवासियांच्या त्या कस्तुरबा झाल्या. १९३६ मध्ये मीरा बहननंतर बापू शेगाव मध्ये आले. खेड्यात ग्रामोत्थनाचे कार्य करण्यासाठी योग्य शेगाव दिसून आले. येथेच आश्रमाचा पाया रोवला गेला. बापू, बा व अन्य कार्यकर्ते आश्रमात राहून कार्य करू लागले. आश्रम नियम व तत्वावर चालत असल्याने बा वा बापूंना कामे करावी लागत. आश्रमची प्रार्थना, रसोडा, सूतकताई, वाचन, स्वच्छता, पाहुण्यांच्या आरोग्याची देखभाल बा करायच्या. स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांचा मोठा सहभाग होता. शेकडो स्त्रियांनी तुरूंगवास सहन केला. बा व महिलांनी दारू दुकांनासमोर निदर्शन व सत्याग्रह केल्याचे नमूद आहे. आज अशा सत्याग्रहाची गरज आहे. दारूवर महिलाच बंदी आणू शकतात. मातृदिनी महिलांनी दारूबंदीचा संकल्प केल्यास बा यांना ती खरी श्रद्धांजली ठरेल!
आगा खा पॅलेसमध्येच समाधी
बापूंनी १९८२ ला करा वा मराचा नारा दिला. मुंबईच्या सभेत उपस्थित राहण्यासाठी बा रवाना झाल्या. तत्पूर्वी आश्रमात बकुळीचे झाड लावून पर्यावरणाचा संदेश दिला. वृक्षारोपण व संवर्धनाचे महत्त्व सांगून गेल्या. ९ आॅगस्टला बा यांना अटक करून पुण्याच्या आगाखाँ पॅलेसमध्ये ठेवण्यात आले. बा ५ आॅगस्टला आश्रमातून गेल्या त्या परत न येण्यासाठीच! स्वातंत्र्यासाठी ब्रिटीशांशी लढा देणाऱ्या बा ना स्वतंत्र भारत पाहण्याचे भाग्य लाभले नाही. बंदीवासातच त्यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले.