कार्तिक पौर्णिमा उत्सवास उसळला जनसागर
By Admin | Updated: November 28, 2015 03:09 IST2015-11-28T03:09:54+5:302015-11-28T03:09:54+5:30
येथील धम्मभूमीत कार्तिक पौर्णिमा उत्सव आणि वर्षावास समापन कार्यक्रम बुधवारी पार पडला. हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधवाची यावेळी उपस्थिती होती.

कार्तिक पौर्णिमा उत्सवास उसळला जनसागर
खासदारांकडून धम्मराजिक महाविहाराला २० लाखांच्या मदतीची घोषणा : सांस्कृतिक व सांगीतिक कार्यक्रमाची मेजवानी
केळझर : येथील धम्मभूमीत कार्तिक पौर्णिमा उत्सव आणि वर्षावास समापन कार्यक्रम बुधवारी पार पडला. हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधवाची यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, जि. प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, जि. प. सदस्य विरेंद रणनवरे, सरपंच रेखा शेंदरे, उपसरपंच फारूख शेख आदी मान्यवर उपस्थित होते. या धम्मराजिक महाविहाराचे सचिव इंजिनिअर पी.एस. खोब्रागडे यांनी प्रास्ताविकेतून धम्मभूमित राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. त्यासोबतच तेथील भौतिक सोयीसुविधांच्या उणीवाबाबतही उपस्थितांना अवगत केले.
खा. तडस आपल्या अतिथी भाषणात म्हणाले, घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे माझ्यासारखा सर्वसामान्य माणसाला संसदेत जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. बाबासाहेब नसते तर आज मी आपल्या समोर नसतो. संविधान दिनाचे औचित्य साधत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती आपल्या भावना खा. तडस यांनी प्रकट केल्या. तसेच २०१५-१६ व १६-१७ या दोन वर्षात या धम्मराजिक महाविहाराला त्यांच्या निधीतून वीस लाख रूपये देण्याची घोषणा केली.
तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरूवात सकाळी ध्वजारोहनाने करण्यात आली. तसेच समापन, धम्मवंदना, भोजनदान आदी कार्यक्रम अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत सदानंद महास्थविर यांच्या मार्गदर्शनात पार पडले. धम्मदेसना कार्यक्रमाला भदंत संघसेना, लेह (लद्दाख) यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे आर. डी. जोगंदड, सीबीआय नागपूरचे डीआयजी संदीप तामगाडगे, विक्रीकर विभागाचे प्रशांत रोकडे यांची यावेळी व्याख्याने झालीत. सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम आणि भीम व बुद्धगीतांचा कार्यक्रम झाला. रात्री कव्वालीचा कार्यक्रम झाला. भाविकांचा जनसागर रात्रीही कायम होता. संचालन पी. एस. खोब्रागडे व राजेंद्र फुले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध सेवा संघ, श्रामनेर सत्यानंद स्मारक समिती व उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.(वार्ताहर)