कपाशीवर दहिया व करपा
By Admin | Updated: November 23, 2015 01:48 IST2015-11-23T01:48:05+5:302015-11-23T01:48:05+5:30
जिल्ह्यात कपाशीचे उत्पन्न निघणे सुरू झाले आहे. अशात कपाशीवर दहिया व करपा रोगाचा प्रभाव दिसून येत आहे.

कपाशीवर दहिया व करपा
तुरींवर अळ्यांचे आक्रमण : शेतकरी पुन्हा अडचणीत
वर्धा : जिल्ह्यात कपाशीचे उत्पन्न निघणे सुरू झाले आहे. अशात कपाशीवर दहिया व करपा रोगाचा प्रभाव दिसून येत आहे. या रोगामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर तुरीवर अळ्यांचा हल्ला होत आहे. सध्या तुरीला फूल येणे सुरू आहे. या अळ्यांमुळे तुरीच्या उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्या वर्तविली जात आहे. या रोगांवर आळा घालण्याकरिता शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात योग्य नियोजन करण्याची गरज वर्तविण्यात आली आहे.
कपाशीवर अनुजिवी करपा तसेच दहिया रोगाची लक्षणे आढळून आली आहेत. कपाशीवर अनुजिवी करपा रोगाचे लक्षणे पाहता प्रारंभी पानाच्या खालच्या बाजूस तेलीय रंगाचे कोनात्मक ठिपके दिसतात. रोगाच्या तीव्रतेनुसार पानाच्या मुख्य व उपशिरा काळ्या पडतात. देठावर व फांद्यावर काळपट किंवा तांबडे ठिपके पडतात. रोगाची तीव्रता वाढल्यास झाडाची पाने, फांद्या व अपरिपक्व काळपट बोंडे गळून पडतात. या रोगाच्या व्यवस्थापनासाठी स्ट्रेप्टोसायक्लिन १ ग्रॅम अधिक कॉपर आॅक्सीक्लोराईड २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १२ दिवसांच्या अंतराने २ वेळा फवारणी करण्याचे कृषी विभागाने कळविले आहे.
दहिया या रोगाची लागण झाल्यास पानाच्या खालच्या बाजूला आकार विरहित पांढऱ्या रंगाचे दही शिंपडल्यासारखे ठिपके दिसतात. हा बुरशीजन्य रोग आहे. या रोगाच्या व्यवस्थापनासाठी पाण्यात मिसळणारे २५ ग्रॅम गंधक १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. शेतकरी बांधवांनी कृषी विभागाने दिलेल्या पद्धतीचा अवलंब करावा असे सेलसूरा येथील कृषी विज्ञान पीक संरक्षण शस्त्रज्ञ डॉ. एस. यू. नेमाडे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.ए. भारती यांनी कळविले आहे.
तूर पिकाला फुले धरण्याच्या वेळेस व शेंगा भरण्याच्या वेळेस पाण्याचा ताण पडणार नाही. याची दक्षता घेऊन संरक्षित ओलित करावे. फुलगळ हा तूर पिकाचा नैसर्गिक गुणधर्म आहे. फुलगळ धुक्यामुळे किंवा वातावरणातील आर्द्रतेमुळे होत असल्याच पोटॅशियम नायट्रेट (१३:०:४५) या विद्राव्य खताची १०० ग्रॅम अधिक प्लॅनोफिक्स ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोबतच शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसी ३ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाचे अंतराने दोन वेळा फवारणी करावी, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी दिली आहे.(प्रतिनिधी)