लॅन्को कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीकमांगो आंदोलन
By Admin | Updated: October 25, 2016 02:00 IST2016-10-25T02:00:10+5:302016-10-25T02:00:10+5:30
मांडवा येथील लॅन्को थर्मल कंपनीच्या कामगारांचे वेतन थकले आहे. दिवाळी सण तोंडावर आल्यामुळे कंपनीने

लॅन्को कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीकमांगो आंदोलन
थकीत वेतनाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष मंगळवारी चर्चा
वर्धा : मांडवा येथील लॅन्को थर्मल कंपनीच्या कामगारांचे वेतन थकले आहे. दिवाळी सण तोंडावर आल्यामुळे कंपनीने कामगारांचे वेतन देण्याची मागणी केली. मात्र याकडे कंपनीने दुर्लक्ष केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी करीत सोमवारी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिकमांगो आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान कामगारांच्या प्रतिनिधीसोबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी चर्चा केली. याचवेळी त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाशीही चर्चा केली. दोघांशी झालेल्या चर्चेनंतर मंगळवारी सकाळी ११ वाजता या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात निर्णायक सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला जिल्हा कामगार अधिकारी, कंपनीचे अधिकारी व कामगार प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती कामगार संघटनेचे अध्यक्ष सुनील गफाट यांनी दिली.
तत्पूवी कामगारांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्या सादर करण्यात आल्या. या निवेदनानुसार ७ आॅक्टोबर रोजी कंपनी व्यवस्थापनास कामगार संघटनेच्यावतीने वेतनासंदर्भात अर्ज सादर करण्यात आला होता. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा २१ आॅक्टोबरला कंपनी व्यवस्थापनाला अर्ज करण्यात आला. तरी कंपनी व्यवस्थापनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात सीएसएस कामगारांचे जून, जुलै २०१६ च्या वेतनासोबत बोनस, पीएफयुएन नंबर, वेतन स्लिप, जॉईनींग लेटर, एप्रिल-मे २०१६ चे काही कामगारांचे थकीत वेतन, लोकल ठेकेदारांचे थकित पेमेंट देण्याची मागणी करण्यात आली. यासह मृत कामगार श्रीकांत पांडे यांच्या कुटुंबाला अद्यापर्यंत कोणतीही मदत मिळालेली नाही, त्यांना ती देण्यात यावी, सेप्टी फायरच्या कामगारांचे २४ महिन्यांचे थकीत वेतन सन २०१३ जून ते २०१५ जून पर्यंतचे दोन वर्षांचे थकीत वेतन देण्यात यावे, यासह अनेक मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास दिवाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर साजरी करण्याचा इशारा कामागरांनी दिला होता. यावर आता उद्या चर्चा होणार असून त्यात होणाऱ्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यावेळी प्रमोद जावळेकर, मनोज देवळे, राहुल भोरे, प्रदीप नसकरी, बंडू शिंदे, प्रशांत पाटणकर, निखील गांडोळे, मेघनाथ रामटेके, वसीम पठाण, प्रफुल कुटे, प्रमोद लांडगे, मनोज काकेळे, सचिन तामगाडगे, श्याम जावळेकर, अविनाश गफाट यांच्यासह कामगार उपस्थित होते.(प्रतिनिधी)