कल्याणी लोणकर वाणिज्य शाखेतून जिल्ह्यात प्रथम
By Admin | Updated: May 26, 2016 00:23 IST2016-05-26T00:23:00+5:302016-05-26T00:23:00+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने बारावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला.

कल्याणी लोणकर वाणिज्य शाखेतून जिल्ह्यात प्रथम
जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचे तालुकानिहाय निकाल
वर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने बारावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात जिल्ह्यात यंदा मुलींनीच बाजी मारली. पहिल्या चारही क्रमांकावर मुलीच असून एकाही मुलाचा त्यात समावेश नाही. यातील गो. से. वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी कल्याणी ज्ञानेश्वर लोणकर हिने ९३.८५ टक्के गुण प्राप्त केले. जिल्ह्यात तिसरी आणि वाणिज्य शाखेत ती जिल्ह्यातून प्रथम आली आहे. जिल्ह्यात प्रथम चारही क्रमांकांवर मुलींचीच सरशी आहे. विज्ञान शाखेची स्वराली घोडखांदे ही जिल्ह्यात अव्वल, तर गांधीग्राम कनिष्ठ महाविद्यालयाची प्रियाली गाठे ही दुसऱ्या क्रमांकावर आणि गो.से. वाणिज्य महाविद्यालयाची कल्याणी लोणकर तिसऱ्या, तर चतुर्थ स्थानावर न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान शाखेची उर्जिता दीपक चौधरी ही आहे. जिल्ह्यात आष्टी तालुक्याचा निकाल सर्वाधिक ८९.५६ टक्के इतका लागला आहे.
स्वराली होणार वैज्ञानिक
-न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी स्वराली विलास घोडखांदे हिने ९६ टक्के गुण प्राप्त करीत जिल्ह्यात आणि मुलींतूनही प्रथम येण्याचा मान मिळविला. तिला भविष्यात काय व्हायचे आहे, याबाबत विचारले असता वैज्ञानिक होणार असल्याचे ती स्वयंस्फूर्तपणे म्हणाली. ही केवळ तिची इच्छाच नव्हती तर यासाठी तिने प्रयत्नही सुरू केले आहेत.
-गत दोन वर्षांपासून स्वराली हैद्राबाद येथे आयआयटीचे प्रशिक्षण घेत असून तिने बारावीच्या अभ्यास केलाच नाही. केवळ आयआयटीचा अभ्यासक्रम बारावीशी मिळताजुळता; पण कठीण असतो, असे ती म्हणाली. परीक्षेच्या एक महिन्यापूर्वीपर्यंत ती हैदराबाद येथेच होती. केवळ बारावीच्या परीक्षेसाठी आल्यानंतर ती पुन्हा तेथील आयआयटी जेईई अॅडव्हांस ही परीक्षा देण्याकरिता हैदराबाद येथे परत गेली. कठोर मेहनत घेतल्यास यश नक्कीच असते, असेही ती म्हणाली.
- स्वरालीचे वडील विलास घोडखांदे हे सेलूकाटे येथील जि.प. शाळेत तर तिची आई प्रशंसा या बांगडे विद्यालय पवनार येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.