कलामांनी मिठी मारुन दिली आत्मानुभूतीची पावती
By Admin | Updated: July 31, 2015 02:17 IST2015-07-31T02:17:54+5:302015-07-31T02:17:54+5:30
विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ आहे, अशी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची धारणा होती. याचा प्रत्यय त्यांच्या वर्धा येथील भेटी दरम्यान सुभाष शितुत यांनाही आला.

कलामांनी मिठी मारुन दिली आत्मानुभूतीची पावती
‘अग्निपंख’ची प्रत ठरली चीरस्मृती : कलाम आणि सुभाष शितुत यांच्यात रंगली होती अध्यात्मावर चर्चा
श्रेया केने वर्धा
विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ आहे, अशी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची धारणा होती. याचा प्रत्यय त्यांच्या वर्धा येथील भेटी दरम्यान सुभाष शितुत यांनाही आला. राष्ट्रपती असताना डॉ. कलाम यांनी शितुत यांचे ‘ओम आत्मा’ हे पुस्तक वाचले होते. दरम्यान, डॉ. कलाम वर्धेत आले होते. यानंतर शितुत यांना खास बोलावणे पाठविले. दोन मिनिटांची ही भेट तब्बल २० मिनिटांवर गेली. या भेटीनंतर शितुत परत जायला निघाले तेव्हा डॉ. कलाम यांनी त्यांच्या जवळ जावून घट्ट मिठी मारुन तीनदा जोरात ‘मीट आॅफ सोल’ म्हणून निरोप दिला. ही भेट व तो प्रसंग सांगताना शितुत अक्षरश: भारावून गेले.
डॉ. कलाम यांच्या निधनानंतर त्यांच्या वर्धा भेटीदरम्यानच्या आठवणी सुभाष शितुत यांनी ‘लोकमत’जवळ बोलताना ताज्या केल्या. १५ जून २००७ रोजी डॉ. कलाम वर्धा येथे आले होते. राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्यावर डॉ. कलाम यांना वर्धा येथील सुभाष शितुत यांनी संस्कृतमध्ये लिहिलेले ‘ओम आत्मा’ हे पुस्तक भेट म्हणून पाठविले होते. यानंतर शितुत यांना राष्ट्रपती कार्यालयातून अभिनंदनपर पत्र आले. या आधारावर डॉ. कलाम यांनी वर्धा भेटीत शितुत यांची भेटीची इच्छा सुरक्षा अधिकाऱ्याच्याकडे बोलून दाखविली. राष्ट्रपतींचा आदेश आल्यानंतर सबंध यंत्रणा कामाला लागली. ‘हे’ शितुत कोण? याचा शोध सुरू झाला. वर्धेचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी माहिती घेऊन शितुत यांच्या घरी दूरध्वनीवर संपर्क साधला. या कॉलनंतर शितुत यांचे कुटुंबीय अवाक् झाले. तत्कालीन पोलीस अधीक्षक तुकाराम देवतळे यांनी कलाम यांच्यासोबत भेट निश्चित केल्याची बाब सांगितली.
साक्षात राष्ट्रपती डॉ. कलाम यांची भेट झाल्यावर शितुत भारावून गेले. दोघांमध्ये अध्यात्मावर संवाद सुरू झाला. यावेळी त्यांनी जाति-धर्माच्या पलीकडे जावून मानवाच्या कल्याण्याची अपेक्षा व्यक्त केली. या छोटेखानी भेटीत डॉ. कलाम यांनी गायत्रीमंत्र, महामृत्यूंजय मंत्र यांचा अर्थ विचारला.
देशसेवेपेक्षा मानवसेवा श्रेष्ठ असल्याचे कलाम म्हणाले. भारतीय संस्कृती, शास्त्रोक्त मंत्र यावरही चर्चा झाली. हा प्रसंग शितुत यांनी जसाच्या तसा यावेळी कथन केला. यावेळी ते भाऊक झाले होते.
दोन मिनिटांची भेट लांबली २० मिनिटांपर्यंत
डॉ. कलाम यांनी सुभाष शितुत यांनी लिहलेले ‘ओम आत्मा’ हे पुस्तक वाचेले होते. त्यांनी १५ जून २००७ भेटीच्यावेळी शितुत यांना भेटीकरिता निमंत्रण दिले. यावेळी चीफ प्रोटोकॉल यांनी वर्धेच्या विश्रामगृह येथे शितुत यांना भेटीसाठी २ मिनिटांची वेळ निश्चित केली. याची जाणीव शितुत यांना होतीच. स्ट्रांगरूममध्ये बसून डॉ. कलाम यांच्यासोबत शितुत यांचा संवाद सुरू झाला. हा संवाद तब्बल २० मिनिटांपर्यंत लांबला. सुरक्षा यंत्रणेने शितुत यांना सूचना केली. मात्र डॉ. कलाम यांनी त्यांना थांबवून घेतले. बाहेर जाताना आलिंगन देवून आज माझे आत्म्यासोबत मिलन झाले, असा भाव व्यक्त केला. या भेटीने त्यावेळी तैनात असलेले सुरक्षा अधिकारी अचंबित झाले.
‘शितुत’ यांना बोलावण्याचा फर्मान
२० मिनिटांच्या या भेटीनंतर शितुत घरी परतले. मात्र डॉ. कलाम यांना त्यांच्यासोबत पुन्हा संवाद साधायचा होता. त्यांनी शितुत यांना बोलवा, असे सुरक्षा अधिकाऱ्यांना सांगितले. यामुळे संपूर्ण यंत्रणा ढवळून निघाली. त्यांची शोधाशोध सुरू झाली. वरिष्ठ सुरक्षा अधिकारी शितुत यांच्या लहानुजी नगर येथील निवासस्थानी संपूर्ण ताफा घेवून निघाले शितुत यांच्या राष्ट्रपती भेटीमुळे संपूर्ण यंत्रणा ढवळून निघाली.