नगराध्यक्षाच्या आरक्षणाने ‘कही खुशी कही गम’
By Admin | Updated: October 6, 2016 00:34 IST2016-10-06T00:34:20+5:302016-10-06T00:34:20+5:30
जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत मुंबई येथे काढण्यात आली.

नगराध्यक्षाच्या आरक्षणाने ‘कही खुशी कही गम’
वर्धा-हिंगणघाट सर्वसाधारण, पुलगाव सर्वसाधारण महिला, देवळी अनु. जमाती, आर्वी नामाप्र व सिंदी (रेल्वे) अनु. जाती महिला
वर्धा : जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत मुंबई येथे काढण्यात आली. या आरक्षणाची वार्ता जिल्ह्यात धडकताच ‘कुठे खुशी तर कुठे गम’चे वातावरण बघायला मिळाले.
मुंबईत जाहीर झालेल्या आरक्षणात वर्धा व हिंगणघाट सर्वसाधारण, पुलगाव सर्वसाधारण महिला, देवळी अनुसूचित जमाती, आर्वी नागरिकांचा मागास प्रवर्ग व सिंदी (रेल्वे) येथील नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलांकरिता राखीव झाल्याची माहिती जिल्ह्यात मुंबई येथे गेलेल्या काहींनी पुरविली. या माहितीला शासकीय स्तरावर दुजोरा मिळाला नसल्याने यावर शिक्कामोर्तब होवू शकले नाही. यामुळे नगराध्यक्षपदाची स्वप्न बाळगणाऱ्यांची हुरहूर सायंकाळपर्यंत कायम असल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात येत्या वर्षात पालिकेची निवडणूक होणार आहे. यात नव्या प्रभाग रचेनुसार सदस्यांचे आरक्षण जाहीर झाले. नगराध्यक्ष जनतेतून निवडणूण द्यावयाचा असल्यानें या पंचवार्षिकेकरिता अनेकांनी इच्छा बाळगल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. यामुळे जिल्ह्यातील वर्धा, आर्वी, देवळी, पुलगाव, सिंदी (रेल्वे) व हिंगणघाट येथील नागरिकांचे या आरक्षणाकडे लक्ष लागले होते. त्यांची उत्सकूता शिगेला असताना मुंबई येथे आरक्षणाची सोडत झाली. यात इच्छुकांनी आपापल्या परीने आरक्षणाची दिलेली माहिती जिल्हाभर फिरत होती.
जिल्ह्यात पोहोचलेल्या माहितीनुसार, वर्धा व हिंगणघाट नगर परिषद सर्वसाधारण प्रवर्गाकरिता राखीव असल्याचे समोर आले. जिल्ह्यात मोठ्या असलेल्या या दोनही नगरपरिषदेच्या या आरक्षणामुळे येथील इच्छुकांना कुठलाही अडसर राहिला नाही. तर आर्वी नगर परिषद नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता राखीव झाला आहे. यामुळे येथे काहींच्या इच्छेवर पाणी फेरल्याची चर्चा आहे. सिंदी (रेल्वे) नगर परिषदेचे आरक्षण अनुसूचित जाती महिलेकरिता राखीव झाल्याने येथे येत्या पंचवार्षिकेत पुन्हा नगराध्यक्षपदी महिलाच विराजमान होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पुलगावचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेकरिता राखीव झाले आहे. यामुळे सध्या चर्चेत असलेल्या या नगरपरिषदेतील अनेकांच्या आशा मावळल्याचे दिसून आले. या पालिकेतील अनेक दिग्गजांच्या आशांवर पाणी फेरल्या गेल्याचे दिसून आले आहे. देवळी येथील नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीकरिता राखीव झाल्याने येथेही अनेकांच्या आशा मावळल्याचे चित्र दिसून आहे. आजच्या या आरक्षणामुळे जिल्ह्यात निवडणुकीचा रंग चढण्यास प्रारंभ झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आरक्षण जाहीर होताच राजकीय पक्षांकडून उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)