ज्येष्ठांनी साकारला कलागुणांचा आविष्कार
By Admin | Updated: February 2, 2016 01:54 IST2016-02-02T01:54:39+5:302016-02-02T01:54:39+5:30
प्रत्येक मनुष्यात काही कला किंवा छंद असतात. सर्वसामान्यांना सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडताना या अंगीभूत गुणांचा विसर पडतो.

ज्येष्ठांनी साकारला कलागुणांचा आविष्कार
आनंदी कट्टा : कथा, कवितांच्या सादरीकरणातून सामाजिक समस्यांचा ठाव
वर्धा : प्रत्येक मनुष्यात काही कला किंवा छंद असतात. सर्वसामान्यांना सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडताना या अंगीभूत गुणांचा विसर पडतो. आयुष्याच्या निवांतक्षणी अंगीभूत कलागुणांना वाव देण्याकरिता पुरेसा अवधी असतो. ज्येष्ठांतील या कलांना सादर करण्याची संधी आनंदी कट्टयातून मिळाली. ज्येष्ठांनी कथा, कवितांच्या सादरीकरणातून सामाजिक समस्यांचा ठाव घेतला.
रविवारी झालेल्या या कट्टयात ज्येष्ठांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिकांनी यात सक्रीय सहभाग घेत अभिनव व तरल संकल्पना सादर केल्या. ज्येष्ठांनी आजपावेतो जोपासलेल्या कलांचे सादरीकरण करुन उपस्थितांचे मने जिंकली. सेवाव्रती मुलचंद जैन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथील स्वाध्याय मंदिर येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटाउपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून अरुण चवडे, बंडू मुळे, अल्का वानखेडे, प्रभाकर उघडे, अजय हेडाऊ, पुष्पमाला देशमुख, शांता पावडे, संध्या देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या गीतरचनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर भरत मेहता यांच्या भावस्पर्शी गीतगायन झाले. गंगाधर पाटील यांचे गझल गायनाला रसिकांनी दाद दिली.
यानंतर स्पर्धेला प्रारंभ झाला. शोभा कदम यांनी ‘शेतकरी आत्महत्या’ विषयावर कविता सादर करुन शेतकरी जीवनाची व्यथा मांडली. मोहन चिचपाणे यांनी विनोदी किस्से सांगून उपस्थितांना खळखळून हसवले. विजय देशमुख यांनी बोधप्रद कथा कथन केली. प्रतिभा कुलकर्णी यांनी ‘एक तरी मुलगी असावी’ ही भावोत्कठ काव्यरचना सादर केली. तसेच जनार्दन ददगाळ यांनी ‘हसा वृद्धांनो हसा’ या काव्यगायनातून ज्येष्ठामध्ये स्फुरण निर्माण केले. यानंतर भीमराव भोयर व वसंत उघडे यांनी काव्य गायन केले. प्रभाकर देशपांडे यांनी विविध विनोदी प्रसंगाचे सादरीकरण केले. प्रमोद गुंडावार यांच्या गीतगायनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यानंतर ज्योती गाठीबांधे, अवंती ढुमणे, अश्विनी कबाडे यांनीही अनेक भावस्पर्शी रचना सादर केल्या.
स्पर्धेचे परिक्षण वासुदेव गोंधळे, प्रभाकर पाटील, मनोहर देऊळकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांता पावडे यांनी केले. संचालन प्रकाश खंडार व चंदा कबाडे यांनी केले तर आभार भरत मेहता यांनी मानले. कार्यक्रमाला अमित झाडे, शेखर देशमुख, ज्योत्सना ढुमणे, मैथीली खटी, प्रकाश खंडार, विलास ढुमणे, अमन चौहान, विजया छत्रे, मुकूल वाघमारे आदींनी सहकार्य केले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.(स्थानिक प्रतिनिधी)