परीक्षेच्या अवघ्या दहा मिनिटात प्रश्नपत्रिका बाहेर
By Admin | Updated: March 13, 2015 02:03 IST2015-03-13T02:03:17+5:302015-03-13T02:03:17+5:30
सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. सेलू येथे दीपचंद चौधरी विद्यालय व यशवंत विद्यालय हे दोन परीक्षा केंद्र आहे.

परीक्षेच्या अवघ्या दहा मिनिटात प्रश्नपत्रिका बाहेर
सेलू : सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. सेलू येथे दीपचंद चौधरी विद्यालय व यशवंत विद्यालय हे दोन परीक्षा केंद्र आहे. येथे शासनाच्या नव्या नियमानुसार परीक्षेच्या दहा मिनिटांपूर्वी प्रश्नपत्र देण्यात येत आहे. मात्र या दहा मिनिटात या प्रश्नपत्रिकेचे मोबाईलद्वारे छायाचित्र घेत ते वॉट्स अॅपवर टाकण्यात येत असल्याचा प्रकार येथे समोर आला आहे. गुरुवारी भूमिती या विषयाचा पेपर सुरू असताना तो याच पद्धतीने बाहेर आल्याची माहिती आहे. प्रश्न पत्रिका बाहेर येताच या दोन्ही केंद्रावर कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट पहावयास मिळाला.
मोबाईलच्या माध्यमाूतन बाहेर आलेली ही प्रश्नपत्रिका येथील एका खासगी शिकवणी वर्गाच्या शिक्षकाकडे जाते. तिथे ती सोडवून उत्तरांच्या झेरॉक्स काढल्या जातात. त्या झेरॉक्स प्रति ३०० रुपयात एक याप्रमाणे सर्रास विकल्या जात आहेत. जसजशी पेपर संपण्याची वेळ जवळ येत असते त्यानुसार त्या झेरॉक्सचा दर सुद्धा कमी होतो. दीड तासानंतर दोनशेला एक तर शेवटच्या अर्ध्या तासाकरिता शंभर रुपये दर ठरलेला आहे.
सदर प्रकारात काही पालकच आपल्या पाल्यापर्यंत कॉपी कशी पोहचेल याचा प्रयत्न करत असतात. हे सर्व प्रकार पाहिल्यानंतर परीक्षा पद्धत कशासाठी आहे? असा प्रश्न पडतो. संबंधित विद्यालयात परीक्षा काळात असे प्रकार यापूर्वी देखील घडलेले आहेत. या सर्व बाबतीत भरारी पथकाचा कुठेच थांगपत्ता लागत नाही. सर्वच काही सुरळीत सुरू असल्याचा दिखावा करण्यात येत आहे.(तालुका प्रतिनिधी)