बस दुरूस्तीत रिक्त पदांचा खोडा
By Admin | Updated: January 6, 2015 23:04 IST2015-01-06T23:04:54+5:302015-01-06T23:04:54+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जिल्ह्यात ३०४ बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा पुरवित आहेत़ यात मागणी करूनही नवीन बसेस मिळत नसल्याने बहुतांश बसेस वारंवार दुरूस्त कराव्या लागतात़

बस दुरूस्तीत रिक्त पदांचा खोडा
मेकॅनिकलची कमतरता : जिल्ह्यात १९७ पदे रिक्त
प्रशांत हेलोंडे - वर्धा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जिल्ह्यात ३०४ बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा पुरवित आहेत़ यात मागणी करूनही नवीन बसेस मिळत नसल्याने बहुतांश बसेस वारंवार दुरूस्त कराव्या लागतात़ मग, यासाठी मनुष्यबळ तरी पूर्ण असावे, ही अपेक्षा असते; पण तेही नाही़ पाच आगारांच्या वर्कशॉपमध्ये यांत्रिक कामगारांची तब्बल १२२ तर मुख्य वर्कशॉपमध्येही ७५ पदे रिक्त आहेत़ या रिक्त पदांचा फटका बसेसच्या दुरूस्तीला बसत आहे़ या बसेस सुरळीत सुरू ठेवण्याचे आव्हान मात्र वर्कशॉपमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पेलावे लागत आहे़
जिल्ह्यात वर्धा, हिंगणघाट, पुलगाव, आर्वी व तळेगाव असे पाच आगार आहेत़ पाचही आगारांमिळून जिल्ह्याला ३०४ बसेस लाभल्या आहेत़ यातील बहुतांश बसेस कालबाह्य झालेल्या आहेत़ यामुळेच प्रवासात असताना बसेस बंद होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे़ पाचही आगारांतील अनेक बसेस फेरी आटोपून परतली की दुरूस्तीसाठी वर्कशॉपमध्ये पाठवाव्या लागतात़ यासाठी प्रत्येक आगाराला स्वतंत्र वर्कशॉप देण्यात आले आहे़ शिवाय जिल्ह्याचे एकत्रित वर्कशॉपही सेवाग्राम एमआयडीसी परिसरात आहे़ पाच आगारांच्या वर्कशॉपमध्ये एकूण मेकॅनिकलची ३५५ पदे आहेत़ यात २३३ कर्मचारी कार्यरत असून १२२ पदे अद्यापही रिक्त आहेत़ शिवाय सेवाग्राम एमआयडीसी येथील मुख्य वर्कशॉपमध्ये १६० पदे मंजूर असताना केवळ ८५ कर्मचारी कार्यरत आहेत़ या वर्कशॉपमध्येही ७५ पदे रिक्त आहेत़ एकूण ४१५ मंजूर पदांपैकी १९७ मेकॅनिकल कमी असल्याने बसेसची दुरूस्ती करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसते़