असुविधांत गुदमरतोय विद्यार्थ्यांचा जीव

By Admin | Updated: August 11, 2016 00:29 IST2016-08-11T00:29:34+5:302016-08-11T00:29:34+5:30

शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहातील विद्यार्थी गत तीन वर्षांपासून नरकयातना भोगत आहे.

Junkie students | असुविधांत गुदमरतोय विद्यार्थ्यांचा जीव

असुविधांत गुदमरतोय विद्यार्थ्यांचा जीव

शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रकार : दूषित पाणी पुरवठ्याने विद्यार्थ्याचा मृत्यू; लाईट, पंखे बंद
सुरेंद्र डाफ आर्वी
शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहातील विद्यार्थी गत तीन वर्षांपासून नरकयातना भोगत आहे. दूषित पाणी पिल्याने इलेक्ट्रॉनिक तृतीय वर्षाच्या शुभम देवासे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याबाबत डॉक्टरांनी अहवाल देऊनही सुविधा पुरविण्यात कुचराई केली जात आहे. सदर वसतिगृहाला दिलेल्या प्रत्यक्ष भेटीत हा प्रकार उघड झाला. शासनाकडून अनुदान येत असताना असुविधांमुळे विद्यार्थी वसतिगृह सोडण्यास बाध्य होत आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी कार्यवाही करणे अगत्याचे झाले आहे.
शासकीय तंत्रनिकेतनच्या या वसतिगृहात शिक्षणासाठी बाहेर गावातील ६५ विद्यार्थी निवासी आहेत. असुविधांना कंटाळून यातील सात ते आठ विद्यार्थ्यांनी आजारी अवस्थेत वसतिगृह सोडले. मेकॅनिकल तृतीय वर्षाच्या मनीष शिंदे नामक विद्यार्थ्याला त्वजारोग जडला आहे. इतर विद्यार्थ्यांच्या अंगावरही दूषित पाणी पिल्याने पुरळ व चट्टे आल्याची धक्कादायक बाबही वसतिगृहाच्या भेटीत उघड झाली. विद्यार्थ्यांनीही असुविधांचा पाढा वाचला.
आर्वी ते देऊरवाडा मार्गावर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. यात जवळपास १००० ते १५०० विद्यार्थी शिक्षण घेतात. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षांपूर्वी निवासी वसतिगृह बांधण्यात आले. या वसतिगृहात ६५ खोल्या आहे. पाच द्वितीय वर्षाचे तर ५० ते ५५ विद्यार्थी तृतीय वर्षाचे विद्यार्थी वसतिगृहात राहतात. महाविद्यालयाने वॉर्डनची नियुक्ती केली आहे; पण ते उपस्थित राहत नाही. सुरक्षा रक्षक रात्रीच्या वेळी देखरेख करतो. वसतिगृहाच्या खोल्या पावसाळ्यात गळतात. खोल्यांतील दिवे, पंखे नादुरूस्त आहेत. वसतिगृह महाविद्यालयाच्या मागील भागात असल्याने काळोख असतो. परिसरात गाजरगवत वाढले आहे. रस्त्यावर सांडपाणी साचलेले असते. परिणामी, रहदारीसाठी रस्ताच नाही. विद्यार्थ्यांना विहिरीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो; पण त्या पाण्याची दुर्गंधी येते. विहिरीतील पाण्याचा एकदाही उपसा करण्यात आला नाही. १० ते २० कबुतरांनी विहिरीतच घरटे केले आहे. त्यांची विष्ठा पाण्यात पडते. जलशुद्धीकरण उपकरण आहे; पण तेही बंद आहे. महाविद्यालय प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. दूषित व घाण पाणी विद्यार्थ्यांना प्यावे लागत आहे. परिणामी, ५५ विद्यार्थ्यांना त्वचेच्या संसर्ग रोगाने ग्रासले आहे. पावसाळ्यात कबुतर विहिरीच्या पाण्यात पडून मरतात. परिसरात काळोख असतो. तंत्रनिकेतनचे प्राचार्य गुल्हाणे याची बदली झाली असून नवीन प्राचार्य आले; पण ते विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करताना दिसतात.
वसतिगृह व महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू केलेला हा खेळ त्वरित थांबविणे तथा वसतिगृहात सर्व सुविधा पुरविणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

काळोखातच खितपत जगताहेत विद्यार्थी
वसतिगृहाची इमारत दुमजली असून पायऱ्या तसेच आत काळोख असतो. जेवनाच्या हॉलमध्ये १० लाईट लावण्यात आले आहेत; पण त्यापैकी केवळ एकच लाईट सुरू आहे. परिणामी, काळोखातच विद्यार्थ्यांना जेवण करावे लागते. इमारत परिसरातही व्यवस्थित प्रकाश व्यवस्था नाही. प्रसाधनगृहात लाईट नाही. विद्यार्थ्यांना काळोखातच खितपत जगावे लागत आहे. या स्थितीत ते अभ्यास कसा करणार, हा प्रश्नच आहे.

वसतिगृहाच्या खिडक्यांची तावदाणे फुटली आहे. यामुळे रात्री किडे, डास शिरत असून आजारांचे प्रमाण वाढले आहे. कचरा टाकला जात असल्याने घाणीचे साम्राज्य आहे. गवत वाढल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती असते. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. प्रसाधनगृह, शौचालयात दुर्गंधीचे वातावरण आहे. १९ पैकी सहा शौचालय सुरू आहे. परिणामी, विद्यार्थ्यांची कुचंबना होते. प्रसाधनगृहात नळाचीही व्यवस्था नाही.

 

Web Title: Junkie students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.