खड्ड्यांतून होतो ‘त्या’ गावांचा प्रवास
By Admin | Updated: March 19, 2015 01:50 IST2015-03-19T01:50:28+5:302015-03-19T01:50:28+5:30
नागरी ते हिंगणघाट मार्गावरील मानोरा ते लाडकी या दरम्यानचा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला आहे़

खड्ड्यांतून होतो ‘त्या’ गावांचा प्रवास
हिंगणघाट : नागरी ते हिंगणघाट मार्गावरील मानोरा ते लाडकी या दरम्यानचा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला आहे़ यामुळे कित्येक दिवसांपासून दोन्ही गावातील नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे़ रस्त्यावरील हे खड्डे अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहे़ गत अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी खितपत पडली आहे़ संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देत दोन्ही गावांतील ग्रामस्थांच्या मरणयातना थांबवाव्या, अशी मागणी होत आहे़
मानोरा ते लाडकी हा रस्ता आठ किमीचा आहे़ त्यातील तीन किमी रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांची मालिका तयार झाली आहे़ काही ठिकाणी गिट्टी उघडी पडली आहे. यामुळे अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. या मार्गाने दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना खड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे़ चालकांना खड्डे वाचविण्यासाठी कसरत करावी लागते़ परिणामी, अपघातास सामोरे जावे लागते़ खड्यांमुळे दुचाकी चालकांसह अन्य वाहन धारकांना पाठीच्या दुखण्याचा त्रास जडला आहे़ वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे़ सदर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी अनेकदा करण्यात आली; पण संबंधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे़ या रस्त्याची दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे़(तालुका प्रतिनिधी)