प्रदूषणमुक्त जिल्ह्याकरिता ‘नो व्हेईकल डे’मध्ये सहभागी व्हा!
By Admin | Updated: January 12, 2016 01:51 IST2016-01-12T01:51:14+5:302016-01-12T01:51:14+5:30
रस्ता अपघात होऊ नये, यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे.

प्रदूषणमुक्त जिल्ह्याकरिता ‘नो व्हेईकल डे’मध्ये सहभागी व्हा!
आशुतोष सलील : रस्ता सुरक्षा पंधरवड्याचे उद्घाटन; जाम येथेही कार्यक्रम
वर्धा : रस्ता अपघात होऊ नये, यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. रस्ता वाहतुकीचे सर्व नियमांचे वाचन करून दैनंदिन जीवनात त्यांचे पालन करावे. प्रदूषणमुक्त जिल्हा व्हावा, या उद्देश्याने ‘नो व्हेईकल डे’सारखा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले.
रस्ता सुरक्षा अभियानाचे सोमवारी येथील वाहतूक शाखेच्या प्रांगणात उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. २४ जानेवारीपर्यंत उप्रप्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने सदर अभियाने राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, प्र. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, जिल्हा पोलीस उपअधीक्षक आर.जी. किल्लेकर, पोलीस उपअधीक्षक विक्रम साळी, पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष वानखेडे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे, लॉयन्स क्लबचे अनिल नरेडी मंचावर उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी वाहतुकीचे सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावे. असुरक्षितपणे वाहन चालवून स्वत:बरोबर इतरांनाही इजा होणार नाही याची जबाबदारी पोलीस विभागाबरोबरच नागरिकांचीही आहे. यासाठी नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन केले.
दीप प्रज्वलनानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने काढलेल्या वाहतूक नियमासंदर्भातील माहिती पुस्तिका आणि घडी पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी सलिल यांच्या हस्ते झाले. मान्यवरांचे स्वागत रोप देत केले. प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले. संचालन इमरान राही यांनी केले. आभार वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे यांनी मानले. यावेळी पोलीस विभागाचे महेश चाटे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पी.बी. झाडे, वाहन निरीक्षक ए.टी. मेश्राम, एम.डी. बोरडे, डी.पी. सुरडकर, जी.डी. चव्हाण, साळुंखे, पारसे, संघारे, इंगोले, सिरसाट, डडमल, कडू, कपटे, गिऱ्हे व विद्यार्थी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
प्रभात फेरीने जनजागृती
जवाहर नवोदय विद्यालय, भारत स्काऊट गाईड आणि हिंमतसिंग, विकास, आनंद मेघे, नेहरू आणि महर्षी शाळांच्या विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच वाहतुकीचे नियम पाळा... अपघात टाळा, नसेल वेगावर नियंत्रण... मिळेल मृत्यूला आमंत्रण, हॉर्नचा वापर गरजेनुसार करा... आदी घोषणा देऊन वाहतुकीबाबत शहरातून प्रभात फेरी काढून जनजागृती केली. जिल्हा क्रीडा संकुल येथून इतवारा चौक मार्ग वल्लभभाई पटेल पुतळा मार्गे बजाज चौकातील वाहतूक शाखा येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीमध्ये पोलीस विभागाचे बँडपथक, उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
वाहतूक शाखेत चित्र प्रदर्शन
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतुकीच्या नियम आणि घ्यावयाची काळजी याबाबत उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतुक नियंत्रण शाखेच्यावतीने चित्र प्रदर्शन वाहतूक शाखेच्या प्रांगणात भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.