‘जय श्रीराम’च्या गजरात शो भा या त्रा
By Admin | Updated: April 16, 2016 01:31 IST2016-04-16T01:31:02+5:302016-04-16T01:31:02+5:30
प्रभू श्रीराम जन्मोत्सवाची धूम जिल्ह्यात पाहायला मिळाली. गुरूवारी सकाळपाूसन श्रीराम मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती.

‘जय श्रीराम’च्या गजरात शो भा या त्रा
वर्धा शहरात रामनामाचा जयघोष : मिरवणुकीतील देखाव्यातून साकारली रामकथा
वर्धा : प्रभू श्रीराम जन्मोत्सवाची धूम जिल्ह्यात पाहायला मिळाली. गुरूवारी सकाळपाूसन श्रीराम मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. प्रभू रामाच्या दर्शनाकरिता मंदिरांमध्ये रांगा लागल्या होत्या. यानंतर दुपारी व सायंकाळी निघालेल्या प्रभू श्रीरामाच्या शोभायात्रेने वातावरण मंगलमय झाले. रामजन्मानिमित्त रामकथा प्रवचन, शोभायात्रा, झांकी, रक्तदान शिबिर यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्रीरामाच्या जयघोषाने जिल्हा भक्तीरसात न्हाऊन निघाला.
गोल बाजार येथील श्रीराम मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनार्थ गर्दी केली होती. मंदिर परिसरात भाविकांना पुरण व सरबताचे दिवसभर वितरण करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता पालखी पूजन करण्यात आले. यानंतर शोभायात्रेला प्रारंभ झाला. श्रीराम मंदिरातून निघालेली शोभायात्रा बालाजी मंदिर, कपडा लाईन, पत्रावळी चौक, अंबिका चौक, पानाचंद चौक, शनिमंदिर, हनुमान मंदिर सोशालिस्ट चौक, इंदिरा मार्केट, देवी अष्टभूजा चौक, वीर सावरकर चौक, दत्त मंदिर येथून परत श्रीराम मंदिरात पोहोचली.
मथुरा येथे होणारी ‘राधा-कृष्ण फुलांची होळी’ व १०० युवक-युवतींचे ‘रूद्रनाद’ ढोल-ताशा पथक मुख्य आकर्षण ठरले. राज्यातील संत व महापुरूषांच्या झांक्या, प्रभू श्रीरामाचे सजीव दृश्य, श्रीराम, सिता, लक्ष्मण व हनुमानाच्या वेशभूषेतील चिमुकले भाविकांसह नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. शोभायात्रेत सहभागी दिंड्या व भजनी मंडळांनी श्रीरामाचा जयघोष केला. रामनवमीनिमित्त शहरात दूर्गा पूजा उत्सव मंडळ, व्यापारी असो., सामाजिक संघटनांद्वारे स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. भगव्या पताकांनी शहर भगवे झाले होते. बजाज चौकात सकाळपासून भजने सुरू होती. शहरात ठिकठिकाणी अल्पोपहाराचे स्टॉल लावण्यात आले.
जय पवनसुत हनुमान मंदिर पवनसुतनगर देवस्थान ट्रस्टद्वारेही पालखी मिरवणूक काढण्यात आली. श्रीराम शिवमंदिर गांधीनगरद्वारे सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. यात सहभागी बॅन्डपथक, घोडागाडी, दिंडी व भजनी मंडळ लक्ष वेधून घेत होते. ही शोभायात्रा श्रीराम शिव मंदिर, आर्वी नाका, बॅचलर रोड, जुना आरटीओ चौक, शिवाजी चौक, केळकरवाडी येथून मार्गक्रमण करीत मंदिरात पोहोचली. वरुण पाठक व मित्र परिवाराने शोभायात्रा काढली. राममंदिरात समारोप करण्यात आला.
श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समिती अयोध्या धाम शास्त्री चौकद्वारे सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. बजाज चौक, इतवारा चौक, पटेल चौक, अंबिका चौक, निर्मल बेकरी चौक, सोशालिस्ट चौक, इंदिरा मार्केट येथून मार्गक्रमण करीत शोभायात्रा परत मंदिरात पोहोचली. पितळेच्या मूर्त्यांची झांकी मुख्य आकर्षण ठरली.