जय अंबे.. जय दुर्गेच्या गजरात नवदुर्गेची स्थापना
By Admin | Updated: October 2, 2016 00:49 IST2016-10-02T00:49:02+5:302016-10-02T00:49:02+5:30
जय अंबे... जय दूर्गेचा गजर, चौकाचौकात ढोलताशाचा निनाद, अन् गुलालाची उधळण, तर देवीच्या स्थापना होणार असलेल्या मंडपात मंत्रघोष

जय अंबे.. जय दुर्गेच्या गजरात नवदुर्गेची स्थापना
दिवसांपासूनच लंगर : स्त्री शक्तीचा सन्मान करीत आदिशक्तीच्या जागराला प्रारंभ
वर्धा : जय अंबे... जय दूर्गेचा गजर, चौकाचौकात ढोलताशाचा निनाद, अन् गुलालाची उधळण, तर देवीच्या स्थापना होणार असलेल्या मंडपात मंत्रघोष अशा भक्ती व चैतन्यमय वातावरणात वर्धा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी शनिवारी जल्लोषात नवदूर्गेची स्थापना करण्यात आली. देवीच्या स्वागताला वर्षाराणीही सज्ज झाल्यांने भक्तांमध्ये नवा उत्साह संचारला होता. अधून मधून येत असलेला पाऊस व या पावसापासून उघड्यावर नेत असलेल्या देवीची मूर्ती बचावाकरिता भाविकांना चांगलीच कसरत करावी लागली.
या सर्व परिस्थितीवर मात करीत वाजत गाजत मिरवणूक काढत देवीच्या मूर्तीला मंडपांमध्ये आसनस्थ करण्यात आले. स्त्रीशक्तीचा सन्मान करीत आदिशक्तीचा जागर शनिवारपासून सुरू झाला असून पुढील दहा दिवस हा जागर सुरूच राहणार आहे. जिल्ह्यात ८३० सार्वजनिक दूर्गा मंडळाच्यावतीने देवीची स्थापना करण्यात येणार आहे. सायंकाळपर्यंत जिल्ह्यात २०० मंडळांकडून देवीची स्थापना करण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली.
वर्धा शहरातील नवरात्री उत्सव विदर्भात प्रसिद्ध आहे. एक वेगळी सांस्कृतिक ओळख या उत्सवाला आहे. जिल्ह्यात हजारो मंडळांद्वारे देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. शनिवारी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होऊन नवरात्री उत्सवास प्रारंभ झाला. हा उत्सव शरद ॠतूत येत असल्याने याला शारदीय नवरात्र असेही संबोधले जाते. शहरात सकाळपासूनच मंडपांमध्ये मूर्तीस्थापनेला सुरुवात झाली. दिवसभर सर्वत्र मिरवणूक, अंबेचा गजर, ढोलताशाचा निनाद सुरू होता. वर्धा शहरातील व्यापारी लाईन, सोनार लाईन, कच्छी लाईन, मुख्य भाजी मार्केट, शास्त्री चौक, आर्वी नाका, पोद्दार बगीचा, दयाल नगर, कृष्ण नगर, इतवारा, कारला रोड, पत्रावळी चौक, दत्त मंदिर चौक आदी ठिकाणी मानाच्या समजल्या जात असलेल्या दूर्गामूर्तींची विधीवत स्थापना करण्यात आली.
नवरात्रोत्सवातील अन्नदान ही वर्धेची ओळख आहे. शहरातील सर्वाधिक मूर्ती या सिंदी(मेघे) परिसरात तयार होतात. त्यामुळे या मार्गावर सकाळपासूनच गर्दी होती. त्यांच्या स्वागतासाठी या मार्गावर ठिकठिकाणी लंगरचे आयोजनही करण्यात आले होते. यंदाचा नवरात्री उत्सव हा संपूर्ण दहा दिवसाचा असल्याने हा आनंद द्विगणीत झाला आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक दूर्गा मंडळाच्यावतीने रात्री उशिरापर्यंत देवीची स्थापना करण्याचे काम सुरू होते.(शहर प्रतिनिधी)