पुलगाव-नाचणगावात जगन्मातेचा जागर

By Admin | Updated: October 12, 2015 02:19 IST2015-10-12T02:19:13+5:302015-10-12T02:19:13+5:30

दैत्यशक्तीचा पराभव करून देवांच देवपण कायम ठेवणाऱ्या जगन्मातेच्या नवरात्रोत्सवाची पुलगाव शहर व नाचणगाव ग्रामीण भागात जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Jagga's Jagar in Pulgaon-Nanchang | पुलगाव-नाचणगावात जगन्मातेचा जागर

पुलगाव-नाचणगावात जगन्मातेचा जागर

कोलकात्याच्या बंगाली मूर्ती आकर्षण : रोषणाईने मंदिरांमध्येही झगमगाट
पुलगाव : दैत्यशक्तीचा पराभव करून देवांच देवपण कायम ठेवणाऱ्या जगन्मातेच्या नवरात्रोत्सवाची पुलगाव शहर व नाचणगाव ग्रामीण भागात जय्यत तयारी करण्यात आली आहे. सर्वधर्म समभावाचे जतन करणाऱ्या नाचणगाव या गावात खडकपूरा, खाटीकपुरा व बाजार चौकात स्थापन होणाऱ्या बंगाली धाटणीची बनावट असलेल्या रिद्धी, सिद्धी, गणेश व कार्तिकेय यांच्यासह असणाऱ्या दूर्गादेवीच्या मूर्ती भाविकांचे आकर्षण ठरणार आहे. यंदा नवरात्रोत्सव व मोहरम एकाच वेळी असल्याने हे दोन्ही सण हिंदू-मुस्लीम बांधवांसाठी सामाजिक सद्भाव व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक ठरणार आहे. शहरात १९ तर नाचणगावात १५ सार्वजनिक मंडळात घटस्थापना होऊन मा दूर्गेच्या मूर्तीची स्थापना होईल. भरगच्च कार्यक्रमाच्या आयोजनात रासगरबांचे फेर धरून देवीचा जागर होईल.
पुलगाव शहरात हिंगणघाट फैल, गौरक्षण फैल, दखनी फैल, हरिरामनगर, बालाजी मंदिर, गांधी चौक, बसस्थानक परिसर, बरांडा, गुलजारी प्लॉट, शिवाजी कॉलनी, बढे प्लॉट येथे तर नाचणगावात न्यू कुर्ला, सिद्धार्थ नगर, बाजार चौक, खाटीकपुरा, माळीपूरा, पठाणपूरा, अन्नाभाऊ साठे नगर, सिद्धेश्वर मंदिर, भवानी मंदिर येथील मंडळात सार्वजनिक दूर्गोत्सव साजरा होतो. पर्यावरण तसेच आरोग्य विषयक प्रबोधन करणारी दृश्ये, आकर्षक रोषणाई, स्वागत-द्वार व दिव्यांच्या प्रकाशात नाचणगावात न्हावून निघते. गावातील बऱ्याच सार्वजनिक मंडळात दूर्गा मातेच्या मूर्तीचा संपूर्ण खर्च भाविक एकटाच करतो. या खर्चासाठी काही मंडळांचे २०२५ पर्यंत बुकींग आहे. या बुकींगच्या यादीतून ड्रॉ काढून ज्यांचे नाव येईल, त्या भाग्यवंतास मूर्तीचा खर्च करण्याची संधी मिळते. नाचणगावच्या जवळपास सर्वच सार्वजनिक दूर्गोत्सव मंडळात हिंदुंसह जैन, बौद्ध, मुस्लीम सर्व समाजबांधव सहभागी असतात. गावातील प्रकाश कटके व परिवारात देवीच्या मूर्ती बनविल्या जातात. त्या मूर्तीच्या साहित्याचा २ ते ३ हजार खर्च घेऊन मेहनत खर्च न घेता नाममात्र दरात कटके परिवार काही मंडळांना मूर्ती देतात. इतर मंडळातही एकाहून एक सरस मातेच्या बोलक्या मूर्ती स्थापन होतात.
नाचणगावच्या नवरात्रोत्सवाचे आणखी वैशिष्ट्य असे की अष्टमी व नवमी, या दिवशी मंडळांकडून सार्वजनिक महाप्रसाद असतो. खडकपुऱ्यातील बसस्थानकापासूनच्या मंडळांपासून बाजार चौक, सिद्धेश्वर मंदिर, माळीपूरा व इतर सर्वच ठिकाणी सुमारे २० हजार भाविक महाप्रसादाला हजेरी लावतात. नाचणगावच्या या नवरात्रोत्सवाचा समारोप दसऱ्यानंतर विसर्जन मिरवणुकीने होतो. या मिरवणुकीच्या स्वागतासाठी व नवरात्रात दररोज सायंकाळी अंगणात रांगोळ्या घालून प्रत्येक घरी दारात दिवे लावले जातात. गावातील नागरिक भक्तीभावाने मातेचा नऊ दिवस जागर करतात. यामुळे वातावरण मंगलमय असते.

पुलगावात ‘गर्जा महाराष्ट्राचे’ जागरण

शहरातील सूर्योदय दुर्गोत्सव मंडळात पावरहाऊससमोर दररोज रात्री ७ ते ९ पर्यंत गर्जा महाराष्ट्र ग्रूप नागपूर व संच तसेच इतर भाविक गरबा नृत्य सादर करून जागर करणार आहेत. निरंजन बोबडे आणि संच नागपूर हे देवी जागरण करणार आहेत. शहरातील वर्धा नदी काठच्या वशिष्टश्रम राममंदिरात श्रीराम जन्म शोभायात्रा समिती व श्रीराम मंदिर ट्रस्टच्यावतीने २२ आॅक्टोबर रोजी विजयादशमीला रावण दहन कार्यक्रमातून नवरात्रोत्सवाचा समारोप होणार आहे.
श्रीराम मंदिरात आकर्षक रोषणाई करून प्रभू श्रीरामचंद्र व भ्राता लक्ष्मण रावणाचा संहार करतानाचे दृश्य साकारले जाणार आहे. शिवाय शहरातील कठीण माता, भवानी माता, महाकाली, दूर्गा भवानी मंदिरासह अन्य देवस्थानांतही विधीवत घट स्थापनेसह नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंगळवारी घट स्थापनेने दूर्गोत्सवास प्रारंभ होणार असून शहरात तसेच नाचणगाव येथे भक्तीमय वातावरणात नवरात्रोत्सव साजरा होणार आहे.

विरुळ (आकाजी) येथे नवरात्र उत्सव
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विरुळ येथे नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. येथील नवरात्र उत्सवास विशेष महत्त्व आहे. प्राचिन काळातील भवानी व अंबादेवी मंदिरात नवरात्र उत्सवात विदर्भातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून दोन्ही मंदिरात जय्यत तयारी सुरू आहे. सार्वजनिक मंडळाच्या आठ दूर्गादेवीचीही स्थापना होणार आहे. यामुळे नवरात्रोत्सवामध्ये गावाला यात्रेचे स्वरुप प्राप्त होते. अंबादेवी मंदिरात अमरानंद भारती यांची भागवत कथा तर पहाडावाली माता मंदिरातही तयारी सुरू आहे.

महाप्रसाद वितरणासाठी
पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करा

दूर्गोत्सव मंडळांमार्फत महाप्रसाद वितरणाचे कार्यक्रम घेतले जातात. यात थर्माकोल तसेच प्लॉस्टीकच्या वाट्या वापरल्या जातात. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. यामुळे पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा, अशी मागणी वर्धा सोशल फोरमने केली आहे. थर्माकोल, प्लास्टिकच्या वाट्या, प्लेट ऐवजी पळसाच्या पानांपासून तयार होणारे द्रोण वा प्लेटांचा वापर करावा, असे निवेदन फोरमने पोलीस निरीक्षक एम.पी. बुराडे यांना सादर केले.
नवरात्रोत्सवात दूर्गोत्सव मंडळांकडून नवरात्रीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रसादाचे वाटप करण्यात येते. हा प्रसाद थर्माकोल वा प्लास्टिकच्या द्रोणमधून वितरित केला जातो. थर्माकोल व प्लास्टिकच्या वाट्यांची विल्हेवाट लावण्याची समस्या निर्माण होते. शिवाय थर्माकोल आणि प्लास्टिक हे शरीरासाठी हानिकारक आहे. यामुळे दुर्गोत्सव मंडळांनी हा प्रसाद पर्यावरणपूरक पळसाच्या पानांपासून तयार होणारे द्रोण वा कागदाच्या प्लेटांमधून वितरित करण्याच्या सूचना द्याव्या, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी अध्यक्ष अभ्युदय मेघे, सचिव अविनाश सातव, रमेश केला, नितीन झाडे, सुधाकर मेहरे, सतीश बावसे आदी उपस्थित होते.

Web Title: Jagga's Jagar in Pulgaon-Nanchang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.