‘जबलपूर एक्स्प्रेस’च्या तात्पुरत्या थांब्याला अखेर मंजुरी
By Admin | Updated: October 19, 2015 02:25 IST2015-10-19T02:25:18+5:302015-10-19T02:25:18+5:30
गत अनेक वर्षांचे प्रयत्न आणि प्रवाश्यांच्या पाठपुराव्यामुळे जबलपूर-अमरावती या एक्स्प्रेस गाडीचा तात्पुरता थांबा देण्यात आला आहे

‘जबलपूर एक्स्प्रेस’च्या तात्पुरत्या थांब्याला अखेर मंजुरी
प्रवासी उत्सुक : २७ आॅक्टोबरपासून थांबणार गाडी
सिंदी (रेल्वे) : गत अनेक वर्षांचे प्रयत्न आणि प्रवाश्यांच्या पाठपुराव्यामुळे जबलपूर-अमरावती या एक्स्प्रेस गाडीचा तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. यामुळे प्रवाश्यांची उत्सूकता शिगेला पोहोचली असून गाडीच्या स्वागताची जय्यत तयारी केली जात आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसचा येथील स्थानकावर दोन्ही दिशेचा थांबा मंजूर केला ओ. रेल्वे प्रशासनाने तशा आशयाचे पत्र येथील स्टेशन मास्तरला पाठविले आहे. या पत्रावर आमदार समीर कुणावार, खासदार रामदास तडस यांनी समाधान व्यक्त केले. शिवाय मंगळवारी गाडीचे स्वागत करण्यासाठी ते येथे जातीने उपस्थित राहणार आहेत. सदर एक्स्प्रेसला येथील स्थानकावर रितसर थांबा मिळावा, यासाठी विद्यार्थी प्रवासी मित्र मंडळ व अनेक संघटनांनी प्रयत्न चालविले होते. या भागाचे आ. कुणावार यांनी विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांकडून २३ जुलै रोजी एक पत्र ना. सुरेश प्रभु यांना पाठविले होते; पण रेल्वे प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. ना. नितीन गडकरी यांनीही सुरेश प्रभु यांचे याकडे लक्ष वेधले होते. .
तथापि, येत्या २७ आॅक्टोबरपासून ही गाडी अजनी, सिंदी (रेल्वे) आणि चांदूर (रेल्वे) या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. हा थांबा तात्पुरता असल्याचे रेल्वे प्रशासनाने त्यांच्या पत्रकात नमूद केले आहे. स्थानिक विद्यार्थी, प्रवासी मित्र मंडळाने मंगळवारी सकाळी ७ वाजता अमरावतीकडे जाणाऱ्या एक्सप्रेसचे स्वागत करण्याची तयारी चालविली आहे. येथून सुमारे ६४५ विद्यार्थी वर्धेला ये-जा करतात.(प्रतिनिधी)