शेतकऱ्यांवर सोयाबीनचा ‘तोडा’ करण्याची वेळ
By Admin | Updated: October 20, 2014 23:18 IST2014-10-20T23:18:29+5:302014-10-20T23:18:29+5:30
वसूबारसपासून दिवाळीला सुरुवात होत असली तरी सर्वार्थाने धनत्रयोदशीपासून आपण दिवाळी सुरू झाल्याचे मानतो. सोयाबीन विकून कशीबशी दिवाळी साजरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करीत

शेतकऱ्यांवर सोयाबीनचा ‘तोडा’ करण्याची वेळ
वायगाव (नि.) : वसूबारसपासून दिवाळीला सुरुवात होत असली तरी सर्वार्थाने धनत्रयोदशीपासून आपण दिवाळी सुरू झाल्याचे मानतो. सोयाबीन विकून कशीबशी दिवाळी साजरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करीत असलेल्या शेतकऱ्यांवर सोयाबीनचे अत्यल्प उत्पादन झाल्याने सवंगणी न करता तोडा करण्याची वेळ आली आहे.
निसर्गाच्या अवकृपेने यंदाही शेतकरी संकटात सापडला. कापसातूनही फारशा उत्पन्नाची आशा राहिलेली नाही. यावर्षी कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. दुबार-तिबार पेरणीनंतर मध्यंतरी आलेल्या पावसाने पिकांना काहीसे जीवनदान दिल्याने सोयाबिन कसेबसे उगवले. मात्र त्यानंतर पावसाने मारलेल्या दडीने शेतकऱ्याची अवस्था बिकट झाली. पाण्याअभावी सोयाबीनच्या शेंगाही व्यवस्थित भरलेल्या नाही. ज्यामध्ये काहीसे दाणे भरले आहेत तेही ज्वारीच्या दाण्यासारखे आहेत. या कारणाने एकंदरित उत्पन्न तर कमी झालेच पण जेथे एका झाडाला ६० ते ७० शेंगा यायच्या तेथे यंदा केवळ १५ ते २० शेंगाच पहावयास मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन काढण्यापेक्षा एक तर त्यात जनावरे सोडावी किंवा सवंगणीपेक्षा त्याचा तोडा करावा, असा विचार शेतकऱ्यांच्या मनात येऊ लागला आहे.
या परिस्थितीमुळे सोयाबीन पासून उत्पन्नाची कोणतीही आशा आता शेतकऱ्यांना राहिलेली नाही. कपाशीचीही अशीच अवस्था आहे. लाल्या आणि इतर कीडींच्या आक्रमणाने पऱ्हाटीच्या झाडावर बोंडेच धरलेली नाहीत. नांगरणीपासून वेचणीपर्यंतच्या प्रत्येक कामासाठी शेतकऱ्याला मोठा खर्च करावा लागतो. मात्र आजच्या स्थितीत एकरी दोन क्विंटलही कापूस होण्याची शक्यता नाही. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघेल की नाही अशी भीती शेतकऱ्यांना आहे. यंदा कापसाला चांगला भाव मिळले का अशी शंकाही येऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची स्थिती केविलवाणी झालेली आहे. एका पाठोपाठ एक संकटाचा मारा झेलणारा शेतकरी पुरता हतबल झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.(वार्ताहर)