चिमुकल्यांना खेळण्यासाठी मोबाईल देणे घातकच

By Admin | Updated: July 20, 2015 02:06 IST2015-07-20T02:06:58+5:302015-07-20T02:06:58+5:30

आजच्या युगात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्र्वांनाच मोबाईलचे व्यसन जडले आहे. मोबाईलचा चांगला वापर केल्यास चांगले आहे.

It's hard to give the mobile phone to play for the kids | चिमुकल्यांना खेळण्यासाठी मोबाईल देणे घातकच

चिमुकल्यांना खेळण्यासाठी मोबाईल देणे घातकच

वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने व्याख्यान : पोलीसही म्हणतात, स्मार्टफोनच्या अतिवापराने सायबर गुन्ह्यात वाढ
वर्धा : आजच्या युगात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्र्वांनाच मोबाईलचे व्यसन जडले आहे. मोबाईलचा चांगला वापर केल्यास चांगले आहे. पण, त्याचे गैरवापरही होताना दिसतात. चिमुकल्यांना मोबाईलपासून दूरच ठेवावे. चिमुकल्यांसाठी खेळण्यासाठी मोबाईल देणे घातकच आहे, असे विचार मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुशिल गावंडे यांनी व्यक्त केले.
वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने रविवारी शिववैभव सभागृहात ‘स्मार्टफोनच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम आणि स्मार्टफोन व वाढती गुन्हेगारी’ या विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. सुशील गावंडे यांनी मोबाईलच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम तर पोलीस उपनिरीक्षक ममता अफुणे यांनी स्मार्टफोन व वाढती गुन्हेगारीवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सचिन पावडे यांनी केले. डॉ. यशवंत हिवंज यांनी कवितेच्या माध्यमातून वैद्यकीय जनजागृती मंचाने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. व्याख्यानाच्या विषयाला अनुसरून डॉ. शंतनू चव्हाण, प्रा. अमोल गाढवकर, डॉ. आनंद गावढवकर यांनी जवळपास दोन महिने संशोधन केले. त्यासाठी २०० जणांपर्यंत २० प्रश्नांची एक प्रश्नावली दिली आणि त्याची उत्तरे घेत माहिती काढून ग्राफीक्सच्या माध्यमातून ही माहिती उपस्थितांना दिली.
डॉ. गावंडे पुढे म्हणाले, नवीन वस्तूंबाबत मुलींमध्येही मोबाईलचे आकर्षण आहे; परंतु पालक त्यांना समज येण्यापूर्वीच मोबाईल देतात. पाल्यांना मोबाईल देणे गैर नाही, पण त्याचे दुष्परिणाम लक्षात घेतले पाहिजे. मोबाईलच्या अतिवापरामुळे मायग्रेन, मानसिक थकवा जाणवत असून, डोळ्यांचाही त्रास होतो. मोबाईलमुळे जगात कुठेही संपर्क साधने शक्य झाले असले तरी त्याच्या वापरातून गुन्हेही होत आहेत. अनेकांना मोबाईलचे व्यसनच जडले आहे. पुणे येथील मुक्तांगणमध्ये इंटरनेट व्यसनमुक्तीसाठी स्वतंत्र कक्षच स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. संचालन प्रा. अमोल गाढवकर यांनी केले तर आभार आणि संकल्प वाचन डॉ. प्रशांत वाडीभस्मे यांनी केले.
कार्यक्रमाला डॉ. प्रवीण सातपुते, डॉ. नितीन मेशकर, डॉ. अरवींद वंजारी, डॉ. पुरूषोत्तम परतेकी, डॉ. चंद्रकांत जाधव, डॉ. अमोल ठाकरे, डॉ. प्रिया ठाकरे, डॉ. राजेश सरोदे, डॉ. अभिजीत खणके, डॉ. महेंद्र भगत, डॉ. आलोक विश्वास, डॉ. निखील ताल्हन, डॉ. अजय निंबलवार, डॉ. विलास ढगे, डॉ. दीपा ढगे, डॉ. अनुपमा हिवंज, डॉ. रश्मी गोडे, महेश अडसुळे, सुनील अष्टपुत्रे, लॉयन्सचे अध्यक्ष अभिषेक बेद आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पालकांनी पाल्यांचे मोबाईल तपासावे - अफुणे
१४ ते १८ वर्षांपर्यंत शारीरिक बदल घडतात. त्यामुळे अनेक गोष्टींबाबतचे आकर्षण वाढते. त्यातून नको त्या गोष्टीही जाणून घेण्याचा प्रयत्न होतो. त्यासाठी स्मार्टफोनचा वापर केला जात असल्याचे आढळते. बरेचदा मुलींना त्यांचे मित्र मोबाईल देतात पण, हे मोबाईल मुली लपवून ठेवतात. पूर्र्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती. आता विभक्त कुटुंब पद्धती असल्याने त्यांना कौटुंबिक मित्र कमी राहत असल्याने मोबाईलच त्यांचा मित्र बनतो. एकटेपणा घालवण्यासाठी मोबाईलचा वापर होतो. मोबाईलवर फोटो काढणे, पाठविल्यानंतर मैत्रीत दुरावा निर्माण झाल्यास त्याचा वापर बदनामीसाठी केला जात असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. त्यातून सायबर क्राईम वाढतो. त्यामुळे पालकांनी पाल्यांचे मोबाईल तपासावे. पालकांनी पाल्यांची हौस पुरवावी पण त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे, असे विचार उपनिरीक्षक ममता अफुणे यांनी व्यक्त केले.

Web Title: It's hard to give the mobile phone to play for the kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.