७० वर्षांनी झाला पांदण रस्ता मोकळा
By Admin | Updated: February 7, 2016 00:18 IST2016-02-07T00:18:30+5:302016-02-07T00:18:30+5:30
लहानआर्वी ते अंतोरा पांदण रस्ता गत अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे बेपत्ता झाला होता. या बाबीला ७० वर्षे पूर्ण झालीत.

७० वर्षांनी झाला पांदण रस्ता मोकळा
लहान आर्वी ते अंतोरा मार्ग : दोन दिवस उभे राहून हटविले अतिक्रमण
आष्टी (शहीद) : लहानआर्वी ते अंतोरा पांदण रस्ता गत अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे बेपत्ता झाला होता. या बाबीला ७० वर्षे पूर्ण झालीत. सदर प्रकरण शासनदरबारी होते. अखेर तहसीलदार सीमा गजभिये यांनी प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावत निकाल जाहीर केला. यात स्वत: दोन दिवस उभे राहून अतिक्रमण काढले. या कारवाईमुळे शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
लहानआर्वी ते अंतोरा पांदण रस्त्यावर ५०० मीटर अतिक्रमण झाले होते. सदर अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याची मागणी शेतकरी देविदास पात्रे माणिकनगर, शंकर राठी लहानआर्वी, गंगाधर ठाकरे अंतोरा यांनी गत अनेक वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे केली होती. या पांदण रस्त्याला लागून एका राजकीय लोकप्रतिनिधीचे शेत आहे. त्यांनी पांदण रस्त्यावर कब्जा करून शेतकऱ्यांना वेठीस धरले होते. याबाबत तहसीलदार कार्यालयाकडून चौकशी सुरू होती. यात तहसीलदार सीमा गजभिये यांनी घटनास्थळाची चौकशी व प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार केला. पांदण रस्त्यावर अतिक्रमण असल्याची खात्री झाली असता ते हटविण्यासाठी तयारी करण्यात आली.
या प्रकरणाचा निकाल जाहीर होताच जेसीबी मशीन व पोलीस बंदोबस्त बोलवून अतिक्रमण पूर्णपणे काढण्यात आले. पांदण रस्त्यावरील अतिक्रमण हटू नये यासाठी सदर लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे ‘स्टे’ आणण्याकरिता गेला होता; पण जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार गजभिये यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेऊन निकाल कायम ठेवला. परिणामी, सर्व अंदाजांना फोल ठरवित ७० वर्षांपासून असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. यासाठी नायब तहसीलदार मुदृलता मोरे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. गजभिये व मोरे यांच्या धाडसी कारवाईमुळे अतिक्रमण करणारे चांगलेच अडचणीत आले आहेत.(प्रतिनिधी)
अन्य पांदण रस्तेही होणार मोकळे
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पांदण रस्ते अतिक्रमित झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात ये-जा करताना अत्यंत त्रास सहन करावा लागत होता. शासकीय पांदण रस्ते मोकळे करण्याची मागणी शेतकरी, ग्रामस्थांकडून करण्यात येते; पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेच दिसून येते. आता आष्टी तालुक्यातील लहानआर्वी ते अंतोरा हा पांदण रस्ता ७० वर्षांनंतर मोकळा झाला. यामुळे तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अन्य अतिक्रमित पांदण रस्तेही मोकळे करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.
आर्वी, कारंजा तालुक्यातील पांदण रस्तेही शेतकऱ्यांना वहिवाटीकरिता मोकळे करून देणे गरजेचे आहे. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करताना दिसतात.
लहानआर्वी ते अंतोरा पांदण रस्त्यावरील लोकप्रतिनिधीचे अतिक्रमण हटल्याने अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. तालुक्यातील अन्य पांदण रस्तेही आता मोकळे होण्यास वेळ लागणार नाही, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. तहसीलदार गजभिये यांनी अन्य प्रकरणांचाही मागोवा घेत रस्ते मोकळे करणे गरजेचे झाले आहे.