चिखलातून काढावी लागते वाट
By Admin | Updated: August 7, 2016 00:31 IST2016-08-07T00:31:33+5:302016-08-07T00:31:33+5:30
प्रतापनगर परिसरालगतच्या न्यू डुप्लेक्स म्हाडा कॉलनीतील रस्ता पूर्णत: खड्डेमय झाला आहे.

चिखलातून काढावी लागते वाट
न्यू डुप्लेक्स म्हाडा कॉलनीतील प्रकार : मार्ग काढताना वाहन धारकांना करावी लागते तारेवरची कसरत
वर्धा : प्रतापनगर परिसरालगतच्या न्यू डुप्लेक्स म्हाडा कॉलनीतील रस्ता पूर्णत: खड्डेमय झाला आहे. त्यात पावसाचे पाणी साचल्याने आवागमन करताना चांगलीच दमछाक होत आहे. या मार्गाने वाहने तर सोडा पायदळ चालणेही कठीण झाले आहे. नगर पालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तुकडोजी शाळेच्या मैदानाकडून आयटीआय टेकडीकडे जाणाऱ्या मार्गावर न्यू डुप्लेक्स म्हाडा कॉलनी वसलेली आहे. या वसाहतीतील एकमेव मुख्य रस्त्याने दररोज शाळकरी मुले, नागरिक तसेच आयटीआय टेकडीवर सकाळी, सायंकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची गर्दी असते. पालिकेने लक्ष दिले नसल्याने रस्त्याची पुरती चाळणी झाली आहे. रस्त्यावर खोल खड्डे पडले असून पावसाचे पाणी त्या खड्ड्यांमध्ये साचून डबके तयार झाले आहे. यातून वाहन चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने रात्रीच्या सुमारास काही वाहन धारक वाहनासह रस्त्यावरच पडले. पायदळ चालण्यायोग्यही रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागत आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही कानाडोळा केला जात आहे. परिणामी, अपघाताची शक्यता बळावली आहे. पालिका प्रशासनही मोठ्या अपघाताची ती प्रतीक्षा करीत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नगर परिषद प्रशासनाने न्यू डुप्लेक्स म्हाडा कॉलनी परिसरातील रस्त्यांची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
नाली बांधकामाने पडली अडचणीत भर
न्यू डुप्लेक्स म्हाडा कॉलनी परिसरातील रस्त्याची आधीच वाट लागली असल्याने येथून मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. कधी तोल जाऊन खड्ड्यांत पडावे लागेल याचा नेम राहिला नाही. खड्डे इतके खोल आहे की पावसाच्या पाण्याने त्याचा अंदाज घेता येत नाही. अशा परिस्थितीतही त्या रस्त्याच्या एका बाजूने नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. यासाठी लागणारे रेती, गिट्टी आदी साहित्य हे रस्त्यावरच टाकण्यात आले आहे. यामुळे आधीच चिखलाने माखलेल्या रस्त्यावरून मार्ग काढण्यासाठी कसरत करावी लागत होती. यात बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकल्याने शिल्लक राहिलेला चांगला रस्ता अरूंद झाला आहे. आता वाहनधारकांना हाती वाहन धरूनच मार्ग काढावा लागणार आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
समस्या बोकाळल्या, नगरसेवकांचे दुर्लक्ष
या परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्याही नगर परिषदेचे कर्मचारी नियमित साफ करीत नाही. नगरसेवक आले की, तेवढ्यासाठी देखावा केला जातो. नगरसेवकांनी पाठ फिरविली की, कर्मचारीही निघून जातात. परिणामी, आजही नाल्या तुंबलेल्या आहे. नाल्याही भरल्या. रस्त्यावरील खड्डेही जलयुक्त झाल्याने डासांच्या उत्पत्तीला चांगलाच वाव आहे. डासांचे प्रमाण वाढल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यामुळे नगरसेवकांनी लक्ष देत नागरिकांची समस्यांतून सुटका करावी, अशी मागणी होत आहे.