कापसाला ४,५०० रुपयांपेक्षा अधिक भाव मिळणे कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST2020-04-27T05:00:00+5:302020-04-27T05:00:15+5:30
भारतातही सरकीचे भाव १७०० रुपये क्विंटलपर्यंत कमी झाले आहेत. १ क्विंटल कापसातून ३४ किलो रुई तर ६४ किलो रुई निघते. ६३ सेंट प्रति पाउण्ड रुई आणि एका डॉलरचे मूल्य ७५ रुपये यानुसार ३४ किलो रुईचे ३ हजार ५३४ रुपये होतात. १७ रुपये प्रतिकिलो सरकी म्हणजे ६४ किलो रुईचे १,०८८ रुपये होतात. यानुसार १ क्विंटल कापसाला प्रक्रियेअंती ४ हजार ६२२ रुपये भाव मिळू शकतो.

कापसाला ४,५०० रुपयांपेक्षा अधिक भाव मिळणे कठीण
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेच्या बाजारात रूईचे भाव ७० ते ७५ प्रति पाउण्डवरून ६० ते ६३ पाउण्डपर्यंत पडलेत. भारतातही सरकीचे भाव १७०० रुपये क्विंटलपर्यंत कमी झाले आहेत. १ क्विंटल कापसातून ३४ किलो रुई तर ६४ किलो रुई निघते. ६३ सेंट प्रति पाउण्ड रुई आणि एका डॉलरचे मूल्य ७५ रुपये यानुसार ३४ किलो रुईचे ३ हजार ५३४ रुपये होतात. १७ रुपये प्रतिकिलो सरकी म्हणजे ६४ किलो रुईचे १,०८८ रुपये होतात. यानुसार १ क्विंटल कापसाला प्रक्रियेअंती ४ हजार ६२२ रुपये भाव मिळू शकतो. त्यामुळे ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक भावाने कापूस व्यापारी कसे खरेदी करेल, असा सवाल शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रातून केली आहे. कोरोनाचा संकटकाळ लक्षात घेता केंद्र सरकारने सीसीआयला शेतकऱ्यांकडील संपूर्ण कापूस खरेदी करण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी मागणी विजय जावंधिया यांनी केली आहे.
कोरोनाचे सावट असतानाच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. कोरोनाच्या प्रकोपापूर्वी कापूस पिकावर मंदीचे संकट होते. २०१८-२०१९ च्या तुलनेत यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना १ हजार रुपये प्रतिक्विंटल कमी भाव मिळेल. मात्र, केंद्र सरकारने कापसाला घोषित केलेले ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल समर्थन मूल्यही मिळू शकणार नाही, असे यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात विजय जावंधिया यांनी नमूद केले होते.
कोरोनाच्या प्रकोपापूर्वी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून ५ हजार ते ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल कापूस खरेदी केला होता. यावर्षी सीसीआय व महाराष्ट्र पणन महासंघाने जवळपास ४५ टक्के कापसाची खरेदी केली आहे. कोरोनामुळे महामारीची चर्चा होताच पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला. सरकी बियाण्यांच्या भावात मंदी आली. व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी बंद झाली. लॉकडाऊननंतर सीसीआय आणि नाफेडकडून खरेदी बंद झाली. २० एप्रिलपासून संथगतीने कापूस खरेदी सुरू आहे. यामुळेच कापूस खरेदीतील गतिमानता पाहता पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांकडे साठवून असलेला कापूस खरेदी अशक्य आहे. सीसीआयद्वारे केवळ फेअर अॅव्हरेज क्वालिटीचा कापूस खरेदी केला जातो. या धोरणात बदल गरजेचा आहे, कारण कुणीही व्यापारी चांगल्या प्रतीचा कापूस ४ हजार ५०० रुपयांपेक्षा अधिक भाव देऊन कापूस खरेदी करू शकत नाही, असेही जावंधिया यांनी म्हटले आहे.