पेरणीला अद्यापही सिंचनाचाच आधार
By Admin | Updated: June 22, 2016 01:57 IST2016-06-22T01:57:22+5:302016-06-22T01:57:22+5:30
मान्सून आला, मान्सून आला यंदा तो विदर्भावाटे आला अशी हूल उडत असली तरीही तो अद्याप स्थिरावलेला नाही.

पेरणीला अद्यापही सिंचनाचाच आधार
पावसाची प्रतीक्षा कायमच : मान्सून अद्याप न स्थिरावल्याने पेरण्या लांबणीवर
वर्धा : मान्सून आला, मान्सून आला यंदा तो विदर्भावाटे आला अशी हूल उडत असली तरीही तो अद्याप स्थिरावलेला नाही. एकही पाऊस चांगला न झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी पेरणी करण्यास धजावलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात जी अत्यल्प पेरणी झाली आहे व होत आहे त्याला सिंचनाचाच आधार आहे. त्यांच्याही नजरा आता आकाशाकडे वळल्या आहेत.
सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे हात पोळून बसलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा पावसाच्या लहरीपणामुळे अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. मान्सूनपूर्व पेरणी तर जिल्ह्यात खूपच अत्यल्प झाली. त्यानंतर मान्सून दाखल झाला या भावनेने बळीराजा सुखावला खरा; पण पाऊस अद्याप स्थिरावला नाही. चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका अश्या सूचना कृषी विभागानेच दिल्या. त्यामुळे ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे अश्या काहीच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पण त्यानंतरही पावसाचा पत्ता नसल्याने संपूर्ण मदार सिंचनावरच आहे. परिणामी आकाशात ढग गोळा झाले असतानाही अनेक शेतात स्प्रिंक्लरद्वारे कापाशीला सिंचन केले जात आहे. हेदेखील जास्त दिवस शक्य नसल्याने सर्वांच्या नजरा आकाशाकडे असून प्रत्येकाला पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील काहीच भागात तुरळक पेरण्या झाल्या आहेत. पण दमट वातावरणामुळे ही पिकेही धोक्यात आहेत. त्यामुळे पेरणी चांगल्या पावसानंतरच अशी भूमिका घेतली जात आहे.(शहर प्रतिनिधी)
चांगल्या पावसाशिवाय पेरणी नाही
आकाशात काळे ढग गोळा होऊ लागले की आता पाऊस येणारच अशी आशा बळीराजाला असते. त्यातच थोडा जरी पाऊस झाला तरी पूर्वी शेतकरी पेरणीला सुरुवात करायचा. पण या काही वर्षात पावसाची हुलकावणी सर्वांंनाच ठाऊक आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकटही बळीराजाने अनेकवार झेलले आहे. पण आता ती ताकत नसल्याने जोपर्यंत मनासारखा पाऊस येत नाही तोपर्यंत पेरणी करायचीच नाही अशी ठोस आणि सावध भूमिका जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. कृषी विभागानेही अश्याच सूचना दिल्यामुळे उशीर झाला तरी चालेल पण पेरणी नाहीच असे शेतकरी सांगत आहे. सिंचनाच्या भरवश्यावर पेरणी करणारेही आकाशाकडे पाहात आहेत.