पाटचऱ्यांअभावी सिंचन प्रभावित
By Admin | Updated: December 3, 2014 22:55 IST2014-12-03T22:55:19+5:302014-12-03T22:55:19+5:30
परिसरातून लोअर वर्धा प्रकल्पाचा मुख्य कालवा गेला आहे. वर्षभरापासून कालव्यात भरपूर पाणी आहे. परंतु पाटचऱ्यांअभावी रोहण्यातील सदर प्रकल्पातून सिंचन होऊ शकत नाही.

पाटचऱ्यांअभावी सिंचन प्रभावित
रोहणा : परिसरातून लोअर वर्धा प्रकल्पाचा मुख्य कालवा गेला आहे. वर्षभरापासून कालव्यात भरपूर पाणी आहे. परंतु पाटचऱ्यांअभावी रोहण्यातील सदर प्रकल्पातून सिंचन होऊ शकत नाही. परिणामी शेतीला ओलित कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
लोअर वर्धा प्रकल्पातून मुख्य कालव्यापासून पाटचऱ्या काढून शेतकऱ्यांना सिंचनाची सोच उपलब्ध व्हावी म्हणून वर्षभरापूर्वी पाटचऱ्यांच्या कामाची निविदा काढण्यात आली. परंतु वर्षभराचा कालावधी लोटला तरी सुद्धा पाटचऱ्यांचे काम अजूनपर्यंत सुरूच न झाल्याने रोहणा परिसरातील शेतकरी सिंचन करू शकत नाही. शासन राज्यातील सिंचनात वाढ व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचा आव आणत आहे. परंतु ज्यामुळे सिंचनात वाढू होऊ शकते त्या पाटचऱ्यांची कामे अग्रक्रमाने करण्याऐवजी त्यातच दिरंगाई केली जात आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता सदर कामाची निविदा वर्षभरापूर्वी निघाली असली तरी ठेकेदाराला वर्कआर्डर अजून पर्यंत मिळाला नसल्याचे समजले. परिणामी ठेकेदार कामाला सुरूवात करू शकला नाही.
सोयाबीनचे उत्पादन अल्प प्रमाणात झाल्याने त्या जमिनीवर रब्बी पीक घेणे शक्य होते. पण मुख्य कालव्यात भरपूर पाणी असूनही केवळ पाटचऱ्या नसल्याने शेतकरी ओलितापासून वंचित आहे. यासंदर्भात राणी लक्ष्मीबाई पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष अनील देशमुख यांनी लघू पाटबंधारे विभाग आर्वी यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला पण अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्यांच्या प्रयत्नांना अजूनतरी यश आले नाही.
ओलिताची सोय असूनही ती अर्धवट करण्यात आल्याने ओलित करणे शेतकऱ्यांसाठी दिवास्वप्न ठरत आहे. यंदा पाऊस अत्यल्प झाल्याने खरीप हातचा गेला. त्यामुळे रबी पिकाने तरी साथ द्यावी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु त्यासाठी पाण्याची अतोनात आवश्यकता असते. त्यामुळे संबंधित विभागाने आतातरी पाटचऱ्यांची कामे सुरू करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा रबी हंगामही कोरडाच जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.(वार्ताहर)