सफाई कामगारांच्या वेतनात अनियमितता
By Admin | Updated: January 1, 2015 23:07 IST2015-01-01T23:07:43+5:302015-01-01T23:07:43+5:30
स्थानिक नगरपरिषद प्रशासनात कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतनात अनियमितता आहे. यामुळे महागाईच्या काळात संसाराचा गाडा ओढताना कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.

सफाई कामगारांच्या वेतनात अनियमितता
वर्धा : स्थानिक नगरपरिषद प्रशासनात कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतनात अनियमितता आहे. यामुळे महागाईच्या काळात संसाराचा गाडा ओढताना कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. नाईलाजास्तव या कर्मचाऱ्यांना सावकाराच्या दरबारी जाण्याची वेळ आली आहे. मात्र ढिम्म प्रशासनाला याची जाणीव नसल्याने वेतनातील अनियमिततेची समस्या कामय आहे.
वर्धा नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन दोन-चार महिने होत नाही. यामुळे व्याजाने पैसे घेऊनघर चालवावे लागत आहे. नियमानुसार दर महिन्याला ५ तारखेपर्यंत वेतन होणे आवश्यक आहे. मात्र वेतन अनियमित होत असल्याने या महागाईच्या काळात घर चालविणे कठीण होत आहे. वेतन नियमित दिल्यास सावकारांना द्यावे लागणारे व्याज थांबेल. शिवाय सफाई कर्मचाऱ्यांची होणारी आर्थिक ओढाताण थांबेल. परंतु या मुख्य प्रश्नाकडे स्थानिक प्रशासन कानाडोळा करीत असल्याने ही समस्या कायम आहे. वर्धा नगरपालिका कायम आर्थिक तोट्यात असल्याचे सांगते. यामुळे वेतन देण्यात अडसर येतात. प्रत्यक्षात असे नसतानाही सफाई कर्मचाऱ्यांना वेतनाकरिता प्रतीक्षा करावी लागत आहे.
वेतन दरमहिन्याला मिळत नाही. दोन-चार महिन्यांनंतर दिले जाते. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांची ओढाताण होत आहे. मागील चार वर्षांपासून सफाई कर्मचारी वेतन नियमित मिळावे म्हणुन विविध आंदोलन करीत आहे. उपोषण करतात. परंतु नेहमी आश्वासनाची खैरात होत असून प्रत्यक्षात कृती शून्य असते. वेतनातील अनियमिततेने कुटुंबाला अनेक खस्ता खाव्या लागतात. अखेर सावकाराकडे जाण्याखेरीज पर्याय नसतो. काही वर्षांनी सफाई कर्मकारी आत्महत्या करतील, अशी स्थिती निर्माण होत आहे. वेतनातील अनियमिततेचा प्रश्न निकाली काढण्याची गरज व्यक्त होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)