अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात अनियमितता
By Admin | Updated: October 1, 2015 02:53 IST2015-10-01T02:53:30+5:302015-10-01T02:53:30+5:30
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात अनियमितता
वर्धा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याबाबत राज्य शासनाकडे तक्रारी, निवेदन देण्यात येऊनही अनियमितता कायम आहे. त्यामुळे राज्यातील सात अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत विभागीय आयुक्त यांना निवेदन दिले आहे. कर्मचाऱ्यांच्या नियमीत मानधन समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
काही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पूर्ण मानधन मिळत नाही. जिल्ह्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्याकडून नियमीत व वाढीव मानधनसाठी निधी आलेला अआहे. हा निधी जिल्हा कार्यालयाने २० दिवसांपूर्वीच सर्व प्रकल्प कार्यालयांना वितरीत केला असल्याची माहिती आहे. परंतु एप्रिल महिन्यापासून मानधन थकीतच आहे. त्यामुळे जोपर्यंत संपूर्ण थकीत मानधन मिळत नाही तोपर्यंत कृती समिती शासकीय व प्रशासकीय कार्यक्रम, सभा, मासिक अहवाल, अंगणवाडी कार्यालयाला व परिवेक्षिकेला माहिती देणे, अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे प्रशिक्षण या सर्वावर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय निवेदनातून जाहीर करण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व प्रकल्प अधिकारी यांना तातडीने थकीत मानधन देण्याच्या सूचना देण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली. या योजनेत काम करणाऱ्या कर्मचारी या विधवा, घटस्फोटीत, अत्यंत गरीब अशा महिला अधिक आहेत. मानधनातील अनियमिततेने त्याच्यावर उपासमारीची वेळ येते. मानधन मिळाल्यास या कर्मचाऱ्यांची फरपट थांबेल. या योजनेत काम करणाऱ्या ७० टक्के महिलांवर कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे मानधन वेळे मिळणे त्यांच्याकरिता महत्वाचे आहे. या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन कार्यवाही करण्याची सूचना देण्यात यावी अशी मागणी केली आहे. निवेदन सादर करताना आयटक राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे दिलीप उटाणे, विजया पावडे, मंगला इंगोले, वंदना कोळणकर, मैना उईके, असलम पठाण उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)