८,००५ व्यक्तींची गृहभेटीतून तपासणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST2020-05-12T05:00:00+5:302020-05-12T05:00:52+5:30
सदर गावांची एकूण लोकसंख्या ८ हजार ५ च्या घरात असून आरोग्य विभागाच्या विशेष चमूंच्या सहाय्याने गृहभेटी देऊन कुठल्या व्यक्तीमध्ये सर्दी, खोकला, ताप तसेच घसा दुखीची लक्षणे आहेत काय याची शहरनिशा केली जात आहे. आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आलेल्या एकूण २५ चमूद्वारे हे काम सतत १४ दिवस केले जाणार आहे.

८,००५ व्यक्तींची गृहभेटीतून तपासणी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील मृत महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दक्षता म्हणून हिवरा तांडासह हिवरा, जामखुटा, राजनी, हरर्शी, बेलारा, दहेगाव (मु.), बोथली (कि़) बेल्हारा तांडा, पाचोड या गावांचा कंटेन्मेट झोनमध्ये समावेश करून ही गावे सील करण्यात आली आहेत. सदर गावांची एकूण लोकसंख्या ८ हजार ५ च्या घरात असून आरोग्य विभागाच्या विशेष चमूंच्या सहाय्याने गृहभेटी देऊन कुठल्या व्यक्तीमध्ये सर्दी, खोकला, ताप तसेच घसा दुखीची लक्षणे आहेत काय याची शहरनिशा केली जात आहे. आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आलेल्या एकूण २५ चमूद्वारे हे काम सतत १४ दिवस केले जाणार आहे. हिवरा तांडा येथील मृत महिलेच्या निकट संपर्कात आलेल्या २८ व्यक्तींचे घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर अकरा जवळच्या नातेवाईकांना आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
मृत महिलेचा पती अवैध दारूविक्रेता; आर्वी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल
जिल्ह्यात दारूबंदी असली तरी पोलिसांच्या आर्शीवादाने हा अवैध व्यवसाय जिल्ह्यात चालत असल्याचे वास्तव आहे. शिवाय त्याबाबतचे वास्तव अनेक कारवाईत पुढे आले आहे. हिवरा तांडा येथील कोरोना बाधित मृत महिलेला मागील १५ वर्षांपासून दम्याचा आजार होता. इतकेच नव्हे तर तिचा पती दारूविक्रीचा व्यवसाय करायचा. त्याच्यावर आतापर्यंत वेळोवेळी कारवाई करून पोलिसांनी दारूबंदी कायद्यान्वये तीन वेळा गुन्हे दाखल केले आहेत. शिवाय लॉकडाऊनमुळे सदर व्यक्तीचा पानटपरी बंद झाली होती, असे आतापर्यंतच्या पोलीस चौकशीत पुढे आले आहे.
वाशीम येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचेही तपासणीसाठी पाठविले स्वॅब
सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात न्यूमोनियाच्या उपचारासाठी दाखल झालेल्या ६४ वर्षीय रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यानंतर या रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर एकूण ११ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. सदर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गाठले गाव
गुरूवारी सकाळी कोरोना चाचणी अहवाल प्राप्त होताच प्रशासनाच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या. गुरूवारी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी हिवरा तांडा गाठून ग्रामस्थांशी संवाद साधला. शिवाय अधिकची माहिती जाणून घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील घ्यावयाची खबरदारीच्या उपाययोजनांची माहिती दिली.
१४१ व्यक्ती होम क्वारंटाईन
मृतकाचे नातेवाईक असलेल्या आणि संपर्कात आलेल्या दहेगाव मुस्तफा आणि बोथली या दोन गावानाही प्रतिबंधित करून सील करण्यात आले आहे. आतापर्यंत निकट संपर्कात आलेले २८ व्यक्तींचे स्त्राव घेण्यात आले असून ११ व्यक्तींना उपजिल्हा रुग्णालयात अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच आर्वीतील खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिका यांचेही स्वाब घेऊन दक्षता म्हणून रुग्णालय सील करण्यात आले आहे. तर इतर गावातील संपर्कात आलेल्या १४१ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आंजी (मोठी) येथील जिनिंग सील करून जिनिंग मालकाला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.